जळगाव ( सुवर्ण दिप वृत्तसेवा): राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने दरवर्षी राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येते. [ads id="ads1"]
यावर्षी देखील कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
पीक स्पर्धेसाठी रब्बी पीके ज्वारी, गहू, हरभरा,करडई व जवस अशा एकूण 05 पिकांचा सामावेश असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे जमीन असून ती जमीन स्वत: कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकासाठी पिकासाठी अर्ज करता येणार आहे. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्यापीकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक असणार आहे. [ads id="ads2"]
अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२,८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा देखील आवश्यक आहे. ३१ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज भरता येणार आहे.
सर्वसाधारण गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रु.300 तर व आदिवासी गटासाठी पीकनिहाय रक्कम रु. 150 राहील.
तालुकास्तर,जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकाल - प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बक्षिसाचे स्वरुप हे पातळीनुसार असणार आहे. ज्यात तालुका पातळीवरील पहिले बक्षिस पाच हजार रुपये , दुसरे बक्षिस तीन हजार रुपये, तिसरे बक्षिस –दोन हजार रुपये असणार आहे. तर जिल्हा पातळी वरील पहिले बक्षिस हे दहा हजार रुपये, दुसरे बक्षिस - सात हजार रुपये, तिसरे बक्षिस - पाच हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील पहिले बक्षिस - पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षिस - चाळीस हजार रुपये, तिसरे बक्षिस – तीस हजार रुपये असणार आहे.
पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतक-यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन कृषि आयुक्तालयामार्फत करण्यात आल्याचे कृषी संचालक रफिक नाईकवाडी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.