यावल ( सुरेश पाटील )
दि.११ ऑक्टोबर 'जागतिक कन्या दिन' या निमित्ताने यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर.एस. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी येथील ज्योती विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे कायदेविषयक शिबिर घेण्यात आले. [ads id="ads1"]
या कार्यक्रमात शालेय विद्यार्थिनींना विविध कायद्यांची माहिती देऊन "बेटी बचाव बेटी पढाओ" संदेशासह 'पोक्सो' कायद्याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. सध्या सुरू असलेल्या नवरात्री महोत्सवानिमित्त कन्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते. तसेच 11 ऑक्टोबर हा जागतिक कन्या दिन या दोघांचे औचित्य साधून यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे 'बालिकासाठींचे कायदे' या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी समितीचे सदस्य शशिकांत वारूळकर हे प्रमुख वक्ते होते. [ads id="ads2"]
त्यांनी आपल्या विचार व्यक्त करताना सांगितले की, "हा महिना नवरात्रीचा असल्याने भारतीय संस्कृतीत कन्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते. हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वपूर्ण सण मानला जातो. ज्यामध्ये कन्यांना विशेष महत्त्व दिले जात असते. परंतु एकीकडे कन्या पूजन सुरू असतांनाच समाजात वाढत असलेली विकृत मानसिकता कन्यांचे व बालकांचे शोषण करण्याचा प्रयत्न करत असते. संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे याद्वारे हनन केले जात असते. बालिकांच्या निकोप व सुदृढ वाढीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एकीकडे कन्या पूजन करायचे आणि दुसरीकडे कन्यांना गर्भात मारायचे हे उचित नाही. मुली आज कुठलाही क्षेत्रात मागे नाहीत परंतु त्यांचे मानसिक शारीरिक शोषण केले जात असते, हे थांबायला पाहिजे. मुलींनीही जागरूक राहून आपल्या वरील अन्याय झुगारून काढावा त्याला वाच्यता फोडावी." यावेळी त्यांनी 'बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२' ची ही सखोल माहिती दिली या कार्यक्रमासाठी यावल न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक संजीव तडवी समांतर विधी सहाय्यक अजय बडे हेमंत फेगडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योती विद्या मंदिर चे मुख्याध्यापक आर. एम.भंगाळे तर उद्घाटक सी. पी. फिरके हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर डी वायकोळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन वाय. डी. नेमाडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती विद्या मंदिर चे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.