जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाच दिवशी ५ लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन जो नवा इतिहास घडविला त्याने सारे जग अचंबित झाले . जगात अनेकांनी धर्मांतर केले आहे , यातील काही धर्मांतर तलवारीच्या टोकावर , सत्तेच्या जोरावर , पैशाच्या आमिशावर , प्रलोभनाच्या खैरातिवर वा जुलूम, जबरदस्तीवर झालेले आहे , पण बाबासाहेबांच्या या धर्मांतरात यापैकी काहीच नव्हते असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.[ads id="ads1"]
जळगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जयसिंग वाघ बोलत होते .
जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या भाषणात सांगितले की १४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर भारतभरात धर्मांतराचे सोहळे सुरू झाले व ३१ मार्च १९५७ पर्यंत सुमारे २ कोटी जनतेने बौद्ध धर्माचा स्वीकार केला . एकट्या महाराष्ट्रात २८ लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला . जगात अनेकांनी आपापल्या धर्माची स्थापना केली पण त्या त्या धर्मसंस्थापकांनी सुध्दा एकाच वेळेस एवढ्या मोठ्याप्रमाणात सामूहिक धर्मांतर केलेले नाही.[ads id="ads2"]
सुरवातीस पूज्य भंतेजी धम्मबोधी यांनी बुद्ध वंदना घेतली त्यानंतर समता सैनिक दल तर्फे रवींद्र वानखेडे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना दिली . धम्म देसनेत भंतेजी धम्मबोधी यांनी बौद्ध धम्माचे महत्व विषद करून त्याचे आचरण करण्याचे आवाहन केले. नाट्यकर्मी उदय सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हरिश्चंद्र सोनावणे यांनी तर चेतन नन्नवरे यांनी आभार प्रदर्शन केले .
कार्यक्रमास प्रा. चंद्रमणी लभाणे, प्रा. सत्यजित साळवे , डॉ. सी. यू. भालेराव , सचिन बडगे , एम. एन. बिऱ्हाडे , प्रकाश दाभाडे , सरोजिनी लभाणे , सुषमा बिऱ्हाडे, सुषमा भालेराव , डी. एम. भालेराव , सतिष निकम , सुभाष सपकाळे , आर. के. सुरवाडे आदींसह स्त्री पुरुष मोठ्यासंख्येने हजर होते .