संपादकीय विशेष लेख : ओबीसींनी आपली राजकीय ओळख निर्माण करायला हवी...दीपध्वज कोसोदे




साधारणतः मंडल आयोगाच्या शिफारशी व्ही. पी. सिंग सरकारने लागू केल्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा देशभर चर्चिला गेला.ओबीसींचं राजकारणही त्यामुळे केंद्रस्थानी येतांना काही काळ दिसलं. मात्र,देशातील लोकसभा निवडणूक असो,की राज्यातील विधानसभा. प्रस्थापित पक्ष कायम ओबीसींची राजकीय कोंडी करण्याचाच प्रयत्न करीत असतात,असंच चित्र देशभर दिसून येतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकालही त्याला अपवाद नाहीत.संसदेतील ओबीसींच्या रोडावलेल्या खासदार संख्येवरही त्यामुळे चर्चा होतांना दिसते.[ads id="ads1"] 

महाराष्ट्रात पाहिलं तर मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या.४८ पैकी एकट्या मराठा समाजाचे ३०-३१ खासदार निवडून आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा जोरदारपणे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या,अशी मागणी लावून धरली.त्यामुळे स्वाभाविकच ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मराठा विरुद्ध ओबीसी असा उभा संघर्ष पेटला.महाराष्ट्रातील सर्वच प्रस्थापित राजकीय पक्ष या प्रश्नावर मौन साधतांना दिसत आहेत. खरं तर हा प्रश्न काही राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकी पर्यंत तापवत ठेवायचा आहे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.मात्र,वंचितने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेमुळे सर्वच (सत्ताधारी आणि विरोधक) राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. बाळासाहेब आंबेडकर यांचं ओबीसींसाठीचं काम उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. दलित,आदिवासी,आंबेडकरी,ओबीसी बहुजन या समूहांना राजकीय ओळख  देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर नेहमीच मैदानात उभे राहतात.हे महाराष्ट्राने अनेक वेळा अनुभवले आहे.२५जुलै पासून वंचितने काढलेल्या आरक्षण बचाव यात्रेला त्यामुळेच ओबीसींचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.तरीही मोठ्या संख्येने लोक बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यांनी यात्रेत विचारलेल्या,'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही?'किंवा 'मराठा आणि ओबीसी आरक्षणावर प्रस्थापित राजकीय पक्षांची नेमकी भूमिका काय आहे?' या प्रश्नांचे उत्तर आज तरी कोणत्याच राजकीय पक्षाकडे दिसत नाही. बाळासाहेब आंबेडकर यांची मराठा आरक्षणा संबंधीची भूमिका आधीपासूनच स्पष्ट आहे.'मराठा आणि ओबीसी या दोघांचं आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे','गरीब मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे'असं त्यांचं म्हणणं त्यांनी अनेक वेळा पत्रकार परिषदांमधून मांडलं आहे,आताही आरक्षण बचाव यात्रेतून तीच भूमिका बाळासाहेब आंबेडकर सातत्यानं मांडत आहेत.[ads id="ads2"] 

बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आंबेडकरी समूहाने स्वतः ची राजकीय ओळख अगदी 'वंचित'च्या स्थापनेच्याही आधी केलेलीच आहे.'ओबीसींनी देखील स्वतः ची राजकीय ओळख निर्माण करणे आवश्यक आहे'.असा आग्रह बाळासाहेब आंबेडकर आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं करतांना दिसतात. ओबीसींच्या भविष्यातील राजकारणासाठी आणि त्यांचे आरक्षण वाचविण्यासाठी ते किती महत्वाचे आहे,हे ओबीसींनी या यात्रेच्या निमित्ताने समजून घेणे आवश्यक आहे. ओबीसींचे येत्या विधानसभा निवडणुकीत किमान १०० तरी आमदार  निवडून यायला हवेत,हे बाळासाहेब आंबेडकर यांचे म्हणणे त्यासाठीच महत्वाचे आहे.


- दीपध्वज कोसोदे (साहित्यिक)

मुक्ताईनगर जिल्हा जळगाव

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️