फैजपूर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सद्यस्थितीत मानवी जीवन अत्यंत धकाधकीचे, धावपळीचे व तणावपूर्ण झाले असून प्रत्येक जण भौतिक सुख-सोयी मिळविण्याच्या अट्टाहासापोटी आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अशा परिस्थितीत एक वेळ संपत्ती मिळेल मात्र आरोग्यम् धनसंपदा या उक्तीनुसार आरोग्य गमवायची वेळ येईल. यासाठी प्रत्येकाने सजग आणि सतर्क होवून दैनंदिन जीवन शैलीत योगासने व प्राणायाम यांचा समावेश करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच निरामय आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजेच योग असे मनोगत उपप्राचार्य प्रा डॉ मनोहर झेड सुरवाडे यांनी व्यक्त केले.[ads id="ads1"]
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी अश्शुरन्स सेल (आय क्यू ए सी), राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभागाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्याने आयोजित निरामय आरोग्यासाठी योगा व प्राणायाम या कार्यक्रमात बोलत होते.[ads id="ads2"]
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र बी वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपप्राचार्य प्रा डॉ मनोहर सुरवाडे, उपप्राचार्य प्रा डॉ हरीश नेमाडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा डॉ जगदीश पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा उत्पल चौधरी, एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ विजय सोनजे कार्यालय अधीक्षक श्री राजेंद्र तायडे यांच्यासहित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी अधिकारी कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांनी केले. त्यात योग म्हणजे काय..? योगाची आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात, योगाचे महत्त्व सांगितले.
उपप्राचार्य प्रा डॉ मनोहर सुरवाडे यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व सांगून दिवसातील एक तास शारीरिक व्यायाम, योगासने व प्राणायाम करण्याचे आवाहन केले.
यानंतर उभे राहून करावयाची आसने, बैठी आसने, पोटावर व पाठीवर झोपून करावयाची आसने यांच्यासहित विविध प्राणायाम जसे कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने करून घेण्यात आली.
या कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासहित चाळीस एनसीसी कॅडेट्स यांनीही सहभाग नोंदवला.
यावेळी सहभागी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी योगासने व प्राणायामानेच दिवसाची सुरुवात करू असा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेखर महाजन, हर्षल सैंदाणे, भूषण सोनवणे, ओमसिंग राजपूत, वीरेंद्र जैन, रोहित महाजन, सागर सोनवणे, कृष्णा भावसार यांनी परिश्रम घेतले.