जळगाव(सुवर्ण दिप वृत्तसेवा) : आरोग्य क्षेत्रात विविध आजारांवर उपचार करणाऱ्या पद्धती उपलब्ध असून आपले दुखणे कमी व्हावे यासाठी फिजिओथेरपी ही पद्धत हळूहळू अत्यावश्यक होत असून जळगाव येथील पाटील चौधरी दांपत्य यांनी नाशिक येथे अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर सुरू केले आहे.[ads id="ads1"]
जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेले डॉक्टर चेतन चौधरी व डॉक्टर नुपूर पाटील यांनी नाशिक येथील कॉलेज रोड भागात रिक्युर फिजिओथेरपी सेंटर नुकतेच सुरू केले असून या ठिकाणी फिजिओथेरपीसह ऑस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिक ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. [ads id="ads2"]
या ठिकाणी दोन दिवसीय मोफत तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ आयुर्वेद तज्ञ डॉक्टर अनय थिगळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश महाजन, निमाचे वरिष्ठ पदाधिकारी डॉक्टर बी बी देशमुख, डॉक्टर सुरेश पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार राजेश निकम, संदीप महाजन, श्रीराम फौंडेशन सचिव दीपक नगरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी प्रस्ताविकात डॉक्टर चेतन चौधरी यांनी भौतिकोपचार पद्धतीबाबत माहिती देताना पाठीतील मणक्याचे आजार, शरीरातील सर्व प्रकारचे दुखणे, खेळाडूंमध्ये होणाऱ्या दुखापती, शस्त्रक्रियेच्या आधी व नंतरचे व्यायाम, अर्धांग वायू, डोकेदुखी, डिप्रेशन व वयोवृद्धांचे आजार यामध्ये भौतिकोपचार पद्धती कसे काम करते याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉक्टर नुपूर पाटील यांनी महिलांना दैनंदिन कामकाजामध्ये येणाऱ्या अडचणी, सातत्याने होणाऱ्या वेदनाकारक व्याधी या दूर करण्यासाठी आवश्यक ते व्यायाम व उपचार पद्धती बाबत मार्गदर्शन केले. तसेच आहार तज्ञ सुनील पाटील यांनी आपल्या दैनंदिन जीवनात सकस आहाराचे महत्व सांगून विविध आजार टाळण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीचा आहार घ्यावा याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात डॉक्टर अनय थिगळे यांनी सांगितले की आजच्या जीवनशैलीत प्रत्येक शस्त्रक्रियेपूर्वी किंवा शस्त्रक्रियेनंतर भौतिकोपचार पद्धत गुणकारी ठरत असून अनेक शस्त्रक्रिया या उपचार पद्धतीमुळे टाळले जाऊ शकतात. हाडांचे व नसांचे दुखणे यावर ही उपचार पद्धत गुणकारी ठरत असते. शिबिराप्रसंगी सूत्रसंचालन व्यवस्थापक स्वाती पाटील यांनी केले. तर आभार डॉक्टर नुपूर पाटील यांनी मानले
शिबिरात अनेक ज्येष्ठ नागरिक खेळाडू महिला व युवक यांनी भेट देऊन उपचार करवून घेतले.