मुक्ताईनगर येथील कवी, कथाकार दीपध्वज कोसोदे यांचा नुकताच पद्मगंधा प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला 'कबाडा' संग्रह बाजारात उपलब्ध झाला आहे. त्यांची कथा व्यक्तींच्या स्वभाव गुण दोषासह प्रकट होते . कोसोदे यांची कथा तशी नवीन आशय विषय घेऊनच जन्माला येते.[ads id="ads1"]
दीपध्वज कोसोदे यांनी ग्रामीण बोलीभाषेतून ग्रामीणस्तरावरचे जीवन दर्शन घडविले आहे. त्याचप्रमाणे दलित जीवनाचेही दर्शन त्यांच्या कथेतून प्रकर्षाने दिसून येते. कथा या साहित्य प्रकारांमध्ये कोसोदे प्रयोगशीलतेने दाखल होताना दिसून येतात.त्यांचा या पूर्वी 'पंचनामा' कथासंग्रह प्रसिद्ध आहे .एक आगळावेगळा विषय घेऊन वाचकांसमोर त्या वेळीही ते प्रस्तुत झाले होते.[ads id="ads2"]
दीपध्वज कोसोदे यांच्या 'कबाडा' या कथासंग्रहामध्ये 'मनरेगा',' घरकुल',' बचत गट', 'भारत निर्माण' आणि कबाडा अशा ग्रामीण जीवन संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या कथा आहेत.
दीपध्वज कोसोदे हे ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत असल्यामुळे शासन स्तरावरील ग्रामीण प्रशासनातील सर्व बारकावे,त्यांच्या वाटा पळवाटा आणि ग्रामीण जीवनातील कष्टकरी, दलित शोषितांच्या प्रश्नांना थेट भिडण्याची त्यांची वृत्ती या कथांमधून स्पष्टपणे दिसून येते.
त्यांनी कथांमध्ये बोली भाषेतील वाक्प्रचार, म्हणी यांचा चपखलपणे वापर केलेला आहे .कथेतील पात्र, प्रसंग, घटना वाचकांशी थेट बोलत आहेत,की काय, असा भास वाचकांना झाल्याशिवाय राहत नाही .
'मनरेगा'या कथेमध्ये आनंदा गुरचळ याची विहीर मंजूर झालेली असतांना त्याचं विहिरीचं काम शेवटपर्यंत मार्गी लागत नाही. शासकीय पातळीवर योजना कितीही चांगल्या राबवल्याचा आव प्रशासनाकडून आणला जात असला, तरी प्रशासकीय पातळीवर त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही, हेच त्यातून अधोरेखित होते.
कोसोदे यांच्याकडे एक आगळा वेगळा विषय मांडण्याचं कसब असल्यामुळे त्यांची प्रत्येक कथा जिवंतपणाची साक्ष देते. कबाडा या कथासंग्रहामध्ये त्यांनी वेगवेगळे विषय हाताळलेले दिसतात, हे जरी खरं असलं तरी दलित आणि त्याचवेळी ग्रामीण जीवनाच्या या समर्थ कथा आहेत.त्यातून कथाकाराच्या प्रतिभेचेही दर्शन होते.
दिल दोस्ती आणि प्रशासनातील दत्तक दिनांकामुळे आलेली अगतिकता व त्यातून येणारी टोकदार मांडणी ही कथा गांभीर्याने करूनच पुढे जाते.
त्यांच्या पुढील लेखनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा.
- डॉ.अ.फ.भालेराव
मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव
9405706570