मुंबई(सुवर्ण दिप वृत्तसेवा): संसदीय लोकशाही व्यवस्था वाचवायची असेल तर, भाजप आणि आरएसएस च्या विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित येऊन लढलं पाहिजे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडरकर यांनी केले.
मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना ते म्हणाले की 'प्रादेशिक पक्षाचा देखील मुख्यमंत्री होऊ शकतो याचं कारण म्हणजे देशातील संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. मात्र आता अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा प्रयत्न चालू आहे.'[ads id="ads1"]
संसदीय लोकशाही टिकवणं हे खूप महत्वाचं आहे, कारण यामुळे सर्व समाजातील लोकांना प्रतिनिधित्व मिळते. लोकशाही वाचली तर राजकीय पक्ष वाचतात आणि सत्ता अस्तित्वात राहते. अन्यथा सत्ता अस्तित्वात राहत नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
देशात अध्यक्षीय लोकशाही आली तर एकाच समूहाचा राष्ट्रपती किंवा अध्यक्ष होऊ शकतो कारण खालच्या वर्गातील व्यक्तीला मतदान करताना आपला हात थरथरतो आणि वरच्या वर्गातील व्यक्तीला मतदान करताना हात थरथरत नाही.विरोधक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जेल मध्ये टाकायची भीती दाखवून सोबत घेत आहेत. या भितीच्या विरोधात जाऊन जे आरएसएस, बीजेपीच्या विरुद्ध लढू शकतात त्यांनी २०२४ च्या निवडणुका एकत्रित लढवल्या पाहिजेत.असे आवाहन त्यांनी इतर पक्षांना केले आहे. [ads id="ads2"]
महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत युतीच्या संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिवसेना( उ. बा. ठा) ही महाविकास आघाडीसोबत आहे. आमच्या आणि शिवसेनेच्या युतीला वर्ष होत आले आहे मात्र शिवसेनेची महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चा होत नसल्याने आमची आणि शिवसेनेची जागावाटपाची चर्चा देखील होत नाही. युतीच्या संदर्भातला निर्णय आता शिवसेनेच्या कोर्टात आहे, निर्णय झाला नाही तर आम्ही ४८ पैकी ४८ जागा लढवण्याची तयारी करणार आहोत. असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.