बोदवड : तालुक्यातील शिरसाळे गावामध्ये दिवंगत कवी देवानंद गुरचळ लिखित "हा रस्ता अटळ आहे" काव्यसंग्रहाचे काल प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक प्रा. बी के बोदडे सर होते. सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये जळगाव येथून आलेले आनंद ढिवरे यांनी गुरचळ सरांविषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला.[ads id="ads1"]
"दिवंगत कवी देवानंद गुरचळ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट करून दिली" असे मत आनंद ढिवरे यांनी व्यक्त केले. त्यानंतर गुरचड सरांची आई रखुमाबाई आणि पत्नी सुनिता ताई यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रा. बी के बोदडे सर यांनी आणि देवानंद गुरचळ यांची आई आणि पत्नी यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. [ads id="ads2"]
दिवंगत कवी देवानंद गुरचळ यांची पत्नी सुनीताताई गुरचड यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, "माझे पती जरी मरण पावले असले, तरी पुस्तक रुपी ते माझ्या सोबतच आहे". हे पुस्तक जळगाव येथील अथर्व पब्लिकेशन्स यांच्या माध्यमातून छापण्यात आलेले आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. बी के बोदडे सर यांनी दिवंगत कवी देवानंद गुरचड त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले की "शिरसाळ्यासारख्या छोट्याशा गावातून एक कवी जन्माला येतो, ही संपूर्ण बोदवड तालुक्यासाठी गौरवपूर्ण गोष्ट आहे". सर्वात शेवटी आनंद ढिवरे यांनी समारोप करताना सांगितले की, "येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये दिवंगत कवी देवानंद गुरचळ यांची एक कविता विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी येणार आहे, आणि ही गोष्ट म्हणजे दिवंगत कवी देवानंद गुरचळ यांनाच खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल". कार्यक्रमाला शिरसाळे गावातील उपसरपंच गोसावी साहेब, कैलास सूर्यवंशी, गुरुप्रसाद गुरचळ आणि संपूर्ण गावातील महिला पुरुष वर्ग उपस्थित होते. अतिशय भावपूर्ण अशा परिस्थितीत कार्यक्रमाचा समारोप झाला.