पुणे (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे मार्फत विविध विषय व योजनांची जिल्हास्तरीय समितीची बैठका श्रीम.ज्योती कदम, अध्यक्ष जिल्हास्तरीय समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली व विशाल लोंढे सदस्य सचिव जिल्हास्तरीय समिती तथा सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या उपस्थितीत दिनांक २६.१०.२०२३ रोजी १२.०० वाजता पार पडली. [ads id="ads1"]
समाज कल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समिती, गावांची वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणे, ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत, जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती या विषयांची तर धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणेबाबत या योजनेची जिल्हास्तरीय समितींच्या बैठका पार पडल्या. [ads id="ads2"]
सदर बैठकांमध्ये खालीप्रमाणे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
१. जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समिती -
ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित ओळखपत्रांबाबत तहसिलदार यांनी तात्काळ कार्यवाही करणेबाबत सूचना देण्यात आल्या तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याबाबत पोलीस विभागाला कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.
२. गावांची वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणे -
सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जातीवाचक गावांची वस्त्यांची व रस्त्यांची नावे बदलण्याबाबत १५ दिवसात कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.
३. ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत -
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत यांनी सर्व ग्रामसेवकांना पत्रव्यवहार करून ग्रामपंचायत मार्फत ओळखपत्र देणेबाबत कार्यवाही करावी. तसेच साखर कारखान्यांनी, साखर आयुक्तांनी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समन्वय साधून ऊसतोड हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करावी. तसेच सगळ्या ऊसतोड कामगारांचे रेशन पोर्टेब्लिटी करण्यासाठी साखर आयुक्त, आणि साखर कारखान्यांनी तहसिलदार आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना ऊसतोड कामगारांची माहिती उपलब्ध करून द्यावी.
४. जिल्हा दक्षता व सनियंत्रण समिती -
अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गतदाखल गुन्ह यांबाबत प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन ज्या प्रकरणांचा पोलीस तपास चालू आहे त्या प्रकरणांचा तात्काळ तपास करून अहवाल सादर करणेबाबत पोलीस विभागाला सूचना देण्यात आल्या. तसेच उपविभागीय दक्षता समिती स्थापन झाल्याबाबत अहवाल उपविभागीय अधिकारी यांनी सादर करण्याबाबत सूचना दिल्या.
५. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणेबाबत -
धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणेबाबत या योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज स्वामी चिंचोली ता.दौंड व श्री.व्यंकटेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूल वालचंदनगर इंदापूर या दोन शाळांना मान्यता देण्यात आली आहे.
तसेच सर्व विषय व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी साठी सर्व जिल्हास्तरीय समितीतील सदस्य व अशासकीय सदस्य यांनी प्रयत्न करावेत सूचना देण्यात आल्या.यावेळी सर्व विषय व योजनां संबधित जिल्हास्तरीय समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते.