या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी नऊ संशयितांविरुद्ध ॲट्रासिटी अन्वये गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. अक्षय भालेराव याच्यावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बोंढार हवेली गावात गुरुवारी लग्नाच्या वरातीत काहीजण हातात तलवारी व लाठ्या- काठ्या घेऊन नाचत होते. कामाजी तिडके यांच्या दुकानावर आकाश राहुल भालेराव व अक्षय श्रावण भालेराव हे बंधू खरेदी करत होते.
सायंकाळी साडेसातच्या सुमारास संजय तिडके याने गावात डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक का काढली, असे म्हणत तुम्हाला खतम करतो, अशी धमकी देत त्याच्यासह सात ते आठ जणांनी भालेराव बंधूंना मारहाण सुरू केली.
संशयितांनी अक्षय भालेराव याचे हात-पाय धरुन पोटावर खंजरने वार करून त्याची हत्या केली. अक्षयची आई, भाऊ आकाश भालेराव अन्य नातेवाइकांनाही हल्ला करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी बौद्ध वस्तीवर जात घरांवर दगडफेक केली.
या घटनेनंतर गावामध्ये तणाव निर्माण झाला. घटनेची माहित समजताच तातडीने पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. नांदेड जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन केले आहे. हा घटनेमुळे दिवसभर गावात तणावपूर्ण वातावरण होते.