मुख्याध्यापकाला तक्रारदाराकडून शाळेमध्येच ७५ हजार रुपयांचा धनादेश स्विकारताना पथकाने बुधवारी (दि.१४) एरंडोल (जि. जळगाव) येथे अटक केली. विनोद शंकर जाधव (वय ४२, रा. योगेश्वर नगर, कजगाव रोड, पारोळा ता. पारोळा जि. जळगाव), नरेंद्र उत्तम वाघ (वय ४४, रा. समर्थ नगर, भडगाव रोड, पाचोरा, ता. पाचोरा जि. जळगाव), विजय पंढरीनाथ महाजन (वय ५६, रा. माळी वाडा, एरंडोल, ता. एरंडोल, जि. जळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विनोद जाधव महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल (ता. एरंडोल जि. जळगाव)चे मुख्याध्यापक आहेत. तर, नरेंद्र वाघ कनिष्ठ लिपिक आहे. विजय महाजन हे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित महात्मा फुले हायस्कूल, एरंडोलचे अध्यक्ष आहेत.[ads id="ads2"]
पाचोरा (Pachora Dist Jalgaon) येथील ४० वर्षीय तक्रारदार श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित महात्मा फुले हायस्कूल, एरंडोल येथे उपशिक्षक पदावर कार्यरत आहेत. या संस्थेने तक्रारदारांची व त्यांचे उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेले सहकारी मित्र अशा दोघांची बदली १ एप्रिल २०२३ रोजी एरंडोल हायस्कूल येथून महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव येथे केली. याप्रकरणी मंजुरीसाठीचा प्रस्ताव २ मे २०२३ रोजी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तक्रारदारांची व त्यांचे सहकारी उपशिक्षक मित्र अशा दोघांच्या बदलीस स्थगिती देण्यासाठी व पाठवलेला मंजुरी प्रस्ताव रद्द करण्यात यावा, अशा आशयाचे संस्थेचे पत्र शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांच्या नावे देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक जाधव व कनिष्ठ लिपिक वाघ यांनी मंगळवारी (दि.१३) स्वत:सह संस्थेच्या अध्यक्षांसाठी एक महिन्याचा पगार ७५ हजार रुपये धनादेश स्वरुपाने मागितले.
संस्थेचे अध्यक्ष विजय महाजन यांनी कनिष्ठ लिपिक वाघ याला कॉल करून लाचेची रक्कम घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. याप्रकरणी शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने शहानिशा करून सापळा रचला. मुख्याध्यापकांच्या नावे असलेला ७५ हजार रुपयांचा धनादेश मुख्याध्यापक जाधव याने बुधवारी (दि.१४) महात्मा फुले हायस्कूलमध्ये स्विकारताना पथकाने त्याला अटक केली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.