एंडाईत परीवाराचा क्रांतिकारी निर्णय, भडगाव तालुक्यातील चौथा सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह - विधीकर्ते सत्यशोधक भगवान रोकडे
भडगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
कोळगाव ता. भडगाव येथील सत्यशोधक समाज संघ पुरस्कृत विधीकर्ते नाना सुकदेव पाटील रा. कोळगाव ता.भडगाव जि. जळगांव आणि आनंदा शालिक माळी रा. सावित्रीमाई फुले नगर वरवाडे ता. शिरपूर जि. धुळे यांची सुकन्या चि. सौ. कां. प्रियंका यांचा सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भडगाव तालुक्यातील चौथा सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह सत्यशोधक समाज संघ पुरस्कृत विधीकर्ते भगवान रोकडे यांच्या हस्ते संपन्न झाला. विवाह मंडपात येतांना वधू-वरांनी क्रांतीची मशाल पेटवून आगमन केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, तात्यासाहेब जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पूजन करून, उपस्थितीत समाज बांधव आप्तेष्ट नातेवाईक स्नेहीजन यांच्या समक्ष नव वधू-वरांनी आपल्या वैवाहिक जीवनाची शपथ घेतली तद्नंतर तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले लिखित सत्यशोधक मंगलाष्टके गद्यघोस म्हणण्यात आली. सत्यशोधक अजय व सत्यशोधिका प्रियंका दोन्ही ही उच्चशिक्षित आहे. समाजातील रुढी परंपरा व अंधश्रद्धा या विचारांना नाकारुन तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांचे विचार स्विकारुन या सार्वजनिक सत्यधर्मीय विवाहाचे आयोजन करण्यात आले होते.
सत्यशोधक समाज संघाचे कोळगाव येथील गुणवंत पाटील, विधीकर्ते भगवान रोकडे, माळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष शामराव माळी, चाळीसगाव येथील मा. उपप्राचार्य डाॅ.एस.डी.महाजन, नाशिक येथील मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, श्री अनंत महाजन चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ उर्फ भैया महाजन यांच्या हस्ते सार्वजनिक सत्यधर्मीय विवाह प्रमाणपत्र देण्यात आले. विवाह सोहळ्याचे सर्व विधी हे सत्यशोधक पद्धतीने करण्यात आले. या सत्यशोधक विवाहाचे नातलग, आप्तेष्ट व कोळगाव तसेच परीसरात एंडाईत परीवाराचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.