भारत-भूतान-नेपाळ देशांमध्ये दुचाकीवरील यात्रेचे नाशिकमध्ये स्वागत



नाशिक (सुवर्ण दिप वृत्तसेवा): भारत भूतान नेपाळ दुचाकीवरील यात्रेच्या 11 व्या दिवशी यात्रेतील दुचाकीस्वारांचे स्वागत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिक शाखेतर्फे आज हुतात्मा स्मारक, नाशिक येथे सकाळी साडेअकरा वाजता पुष्प आणि फळ देवून करण्यात आले. याप्रसंगी बोलताना यात्रेचे प्रमुख एडवोकेट हरिंदर लॅली म्हणाले की जादूटोणा विरोधी, अंधश्रद्धा विरोधी अस्तित्वात असलेल्या इंडियन पीनल कोड मधील कायद्यांचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. यासाठी त्यांनी पंजाबी भाषेत स्वतंत्रपणे अशा कायद्याबाबत पुस्तक प्रकाशित केलेले असून त्याचे इतर भाषांमध्ये भाषांतर होणे गरजेचे आहे. [ads id="ads1"]  
  न्यायालयात घेतल्या जाणाऱ्या शपथेसंदर्भात 'कोणाचे स्मरण करून शपथ घ्यावी' याबाबतचे मार्गदर्शनही त्यांनी केले. युवा पिढीला विवाह विषयक स्वातंत्र्य देणे आवश्यक असून विशेष विवाह कायद्यानुसार विवाहांची नोंद आवश्यक आहे. तसेच युवकांचे शरीर आणि विचारस्वास्थ्य आवश्यक असल्याने राज्यघटनेतील नागरिकांची कर्तव्याचे पालन होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. [ads id="ads1"]  
यात्रेतील दुसरे सहकारी डॉ. राजा राम यांनी त्यांचा बालपणापासून ते चळवळीपर्यंतचा जीवनपट उलगडून सांगितला. सर्व धार्मिक पुजा, अर्चा, कर्मकांड करून देखील अस्तिकांच्या आयुष्यातील समस्या का आहेत याचा विचार होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. मानवी आयुष्यातील समस्या सोडविण्यासाठी तांत्रिक मांत्रिका कडे जाण्यापेक्षा समुपदेशन करून घेणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
भारत भूतान आणि नेपाळ अशा तीनही देशांमध्ये दुचाकीवरून यात्रेचे नियोजन प्रथमच करण्यात आले आहे. तर्कशील सोसायटी पंजाबचे एडवोकेट हरिंदर लॅली, तर्कशील सोसायटी भारतचे डॉ. राजा राम आणि तर्कशील सोसायटी हरियाणाचे डॉ. राजेश पेगन यांनी दिनांक 16 मार्च 2023 पासून दुचाकीवरून तीन देशांची यात्रा सुनाम उधमसिंहवाला, पंजाब येथून सुरु केली आहे. या यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांमध्ये संविधानात सांगितलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देणे आणि त्यांचे पालन करण्याबाबत प्रेरणा देणे हा होय. दुसरा उद्देश, दुचाकीवरून देखील तीनही देशात सलग यात्रा करता येते आणि तिसरा उद्देश तिन्ही देशांमधील विविध संस्कृती समजावून घेणे हा आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यपद्धतीची आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. या स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाराष्ट्रातील या यात्रेचे समन्वयक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विभागाचे कार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन बागुल, जिल्हा प्रधान सचिव यांनी केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री, महेंद्र दातरंगे, समीर शिंदे, अरुण घोडेराव, विजय खंडेराव, प्रभाकर शिरसाठ, यशदा चांदगुडे, डॉ. मिलिंद वाघ, आणि मोठ्या संख्येने नाशिक मधील नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यानंतर ही यात्रा दुपारी दोन वाजता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. दि. 29 मार्च रोजी ही यात्रा मध्यप्रदेशहून महाराष्ट्रात शिरपूर जि. धुळे येथे दाखल झाली असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहकार्याने मुंबई, पुणे, इस्लामपूर, कोल्हापूर मार्गे दि. 4 एप्रिल रोजी गोव्याकडे जाणार आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️