चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटाच्या पायथ्याशी एका दर्ग्याजवळ जंगलात महिलेची हत्या करुन तिचा मृतदेह एका गोणपाटात भरुन फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास समोर आला आहे. गोणपाटात हाडे, केस, कवटी, महिलेची साडी, ब्लाऊज परकर तसेच बांगड्या असं आढळून आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन महिन्यांपूर्वी तिची हत्या करुन मृतदेह गोणपाटात भरुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये (Chalisgaon Rural Pilice) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील कन्नड महामार्ग घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बोढरे शिवारातील क्षेत्र क्रमांक ३१३ मध्ये रविवारी गस्त घालत असतांना वनरक्षक अजय नाना अहिरे यांना काटेरी झुडपाजवळ एका गोणपाटात अनोळखी महिलेचे साडी, ब्लाऊज, परकर तसेच हाडे आढळून आले. वनरक्षक अहिरे यांनी ही बाब वनपाल दिपक किसन जाधव यांना कळविली. त्यानुसार दीपक जाधव हे घटनास्थळी आले.
वनपाल जाधव यांनी घटनेची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनाही दिली. त्यानुसार पोलिसही घटनास्थळी पोहचले. याठिकाणी गोणपाट उघडून पाहिले असता, त्यात कवटी, साडी, परकर, ब्लाऊज, केस, एक काळ्या मण्यांची पोत असं मिळून आलं आणि मानवी कवटी तसेच हाडे स्त्रीजातीची असल्याचं निष्पन्न झालं. दोन ते तीन महिन्यांपूर्वी या महिलेची हत्या मृतदेह गोणपाटमध्ये भरुन त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार या प्रकरणी वनपाल दिपक जाधव यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान केवळ मिळून आलेली केवळ, कवटी, हाडे तसेच मिळालेल्या कपडे, दागिण्यांवरुन महिलेची ओळख पटविण्याचे तर दुसरीकडे त्यानंतर महिलेची मारेकरी शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर चाळीसगाव ग्रामीण पोलीस कामाला लागले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहे.
महिलेची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
सदर महिलेच्या अंगावार नारंगी रंगाची साडी, ब्लाउज, हिरव्या बांगड्या, काळ्या मण्याची पोत, असे मिळून आलं आहे. वरील वर्णननुसार एखाद्या बेपत्ता असलेल्या महिलेबाबत कुणाला काही एक माहिती मिळाल्यास चाळीसगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना मोबाईल क्रमांक 7276622432 यावर तसेच पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण 8329287165 पोलीस नाईक शांताराम पवार 8788395568 अथवा चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या 02589/225033 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलं आहे.