नाशिक (सुवर्ण दिप वृत्तसेवा) नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील सायन्स असोसिएशन तर्फे मंगळवार दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' आणि 'आंतरराष्ट्रीय मिलेट (भरडधान्य) वर्ष 2023' निमित्ताने मा. निलिमा जोरवर, अध्यक्षा, कळसूबाई मिलेट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, अकोले आणि नाशिक यांचे 'मिलेट बाबत प्रदर्शन' आणि 'मिलेटचे महत्त्व' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. [ads id="ads1"]
या प्रसंगी बोलताना मा. निलिमा जोरवर म्हणाल्या की मिलेट हे भरडधान्य, आदिवासी समाजात 'देवधान्य' म्हणून तर शासनातर्फे 'जादुईधान्य' म्हणून प्रचलित होत आहे. आहार पोषण तत्त्वांच्या जागतिक क्रमवारीत मिलेटचा वरचा क्रमांक असून त्यात औषधी गुणधर्म, अँटिऑक्सिडंट, कमी ग्लायसेमिक इंडेक्स, ग्लूटेन विरहित असे विविध गुणधर्म आहेत. मिलेट हे कोरडवाहू पीक असून त्यांच्यापासून झटपट विविध अन्नपदार्थ तयार करता येतात तसेच जनावरांना चारा म्हणूनही मिलेट पिकाच्या विविध भागांचा उपयोग होतो. मिलेट या देशी धान्याच्या बियाणांची प्रतिकारशक्ती वाढलेली असून पीक घेण्यासाठी खतांची किंवा औषधांची गरज पडत नाही. मिलेट पासून बनविलेले अन्न हे पर्यावरणपूरक आणि शाश्वत असून ते सेवन केल्यास इतर कृत्रिमरीत्या निर्माण केलेले पूरक अन्नघटक घेण्याची गरज भासत नाही. परंतु खोट्या मिलेट पासून देखील लोकांनी सावधानता बाळगावी. मिलेटबाबत ज्ञानाचा अभाव, रासायनिक शेतीचे वाढते प्रमाण, तांदूळ, गहू यांची सोप्या पद्धतीने विक्री आणि मिलेट वरील प्रक्रिया थोडीशी अवघड असल्याने मिलेटचा प्रचार प्रसार झाला नाही. मिलेटच्या क्षेत्रात संशोधन, विविध पाककृती तयार करणे तसेच शेती करणे इत्यादी रोजगाराच्या संधी आहेत. स्थानिक आणि हंगामात उपलब्ध असलेले मिलेटचे अन्नसेवन करणे तसेच नियमित व्यायाम, स्क्रीन टाईमची मर्यादित वेळ आणि मेंदू अनावश्यक गोष्टीमध्ये गुंतवून न ठेवणे यासारखी जीवनशैली ठेवल्यास हृदयरोग, कॅन्सर, रक्तदाब, लठ्ठपणा, व्यंधत्व सारखे दुर्धर आजार नक्कीच दूर राहतील. मिलेटच्या प्रचार आणि प्रसारासाठी मिलेटचा समावेश शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात, गर्भवती आणि स्तनदा मातांच्या आहारात करावा आणि मिलेट रेशन दुकानात उपलब्ध व्हावे असे आवाहनही त्यांनी शासनास केले. [ads id="ads2"]
राष्ट्रीय विज्ञान दिननिमित्ताने बोलताना त्या म्हणाल्या की विज्ञान फक्त शाळा कॉलेजमध्ये नसून स्वयंपाकघर, शेती सारख्या ठिकाणी देखील आहे. चिकित्सक वृत्ती, निरीक्षण करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी अंगी बाणली पाहिजे. आभासी जग आणि वास्तविक जग यात प्रचंड फरक आहे. प्रदूषण फक्त जल, वायू आणि आवाज यांचे नाही तर अन्नाचे देखील आहे. सद्यपरिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषित अन्नसेवन केले जात आहे आणि त्यामुळे विविध आजार निर्माण होताना दिसतात. त्यांनी या प्रसंगी श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देखील दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. मंजुषा कुलकर्णी, कला शाखेचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल पठारे आणि विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. डॉ. कल्याणराव टकले यांनी देखील याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी, पाहुण्यांचा परिचय प्रा. वंदना शेवाळे, आभारप्रदर्शन प्रा. डॉ. हेमंत भट आणि सूत्रसंचालन प्रा. डॉ. किशोरी धुमाळ यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आकाश ठाकूर आणि सायन्स असोसिएशनचे ईतर सदस्य प्रा. डॉ. संजय पवार, प्रा. राहुल उपळाईकर, प्रा. निलेश महाजन, प्रा. गणेश दिलवाले, प्रा. डॉ. विशाल माने, प्रा. डॉ. अश्विनी घनबहाद्दूर मोरे, प्रा. प्रणाली पंडित, प्रा. राजश्री नाईक, प्रा. वसीम बेग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.