औरंगाबाद (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - एडीटर अँड प्रेस रिपोटर असोसिएशनने पुढाकार घेवून आयोजित केलेल्या अभिवादन सभेत अनेक मान्यवरांनी बबन कांबळे यांच्याशी आलेल्या संबंधांना व आठवणींना आपल्या भाषणातून उजाळा दिला.
सदर अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते रतनकुमार पंडागळे हे होते. यावेळी या व्यासपीठावर जेष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंडारे, निवृत्त माहिती उपसंचालक यशवंत भंडारे, इंजि. विनय घनबहाद्दुर, बौध्दाचार्य व्ही. के. वाघ, प्रा. भारत सिरसाठ, एडीटर अॅण्ड प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे अध्यक्ष रतनकुमार साळवे आदींची उपस्थिती होती. [ads id="ads1"]
प्रारंभी सम्राटचे संपादक कालकथित बबन कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. प्रा. भारत सिरसाट यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ते म्हणाले की, बबन कांबळे यांनी परिवर्तनवादी पत्रकारितेतून समाजाला दिशा दिली व लेखणीद्वारे आपला एक नैतिक दबाव निर्माण केला. [ads id="ads2"]
जेष्ठ पत्रकार शांतीलाल गायकवाड यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, बबन कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परखड पत्रकारितेची परंपरा कायम ठेवली. कांबळे यांनी वाचक वर्ग निर्माण केला. जेष्ठ विचारवंत प्रा. डॉ. ऋषीकेश कांबळे यांनी बबन कांबळे यांच्या पत्रकारितेचा गौरव करतांना सांगितले की, खैरलांजी प्रकरणा नंतर बबन कांबळे यांनी परिवर्तनवादी पत्रकारितेतून अन्याय अत्याचाराच्या विरुध्द आवाज उठवला व समाजात जाणीवपूर्वक असंतोष पेरण्याचे काम केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार असण्या विषयीचे जे निकष सांगितले ते सर्व निकष बबन कांबळे यांनी आचरणात आणले, त्यांनी निर्भयता जपली. अन्याया विरुध्द आवाज उठवताना बबन कांबळे यांनी राजसत्तेचे भय कधीच बाळगले नाही, असे प्रा. ऋषीकेश कांबळे यांनी स्पष्ट केले.कांबळे यांच्या विनंतीवरुन आपण सम्राट मध्ये त्रिसरण व पंचशीलावर लेख लिहीले, हे लेख चार दिवस प्रसिध्द करण्यात आले, याचाही उल्लेख प्रा. डॉ. कांबळे यांनी केला. जेष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर यांनी सांगितले की चळवळीतील गद्दारांवर व कर्मकांडावर प्रहार करण्याचे कार्य बबन कांबळे यांनी जे केले, त्याला तोड नाही.
सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी ॲड. नामदेव सावंत यांनीही बबन कांबळे यांचेविषयी गौरवोद्वगार काढले. मी पत्रकार त्यांचेमुळेच घडू शकलो. माझ्या कौटुंबिक संकट काळातही त्यांनी मला मोलाची साथ दिली. बबन कांबळे यांनी पत्रकार व संपादक म्हणून वैयक्तिक जीवनातही नैतिकतेचे पालन केले, याचाही उल्लेख नामदेव सावंत यांनी केला. जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे म्हणाले की, बबन कांबळे यांची पत्रकारिता हे एक प्रकारचे मिशन होते. अन्याय, अत्याचाराच्या विरोधातही त्यांनी सातत्याने आवाज उठविला. राहुल साळवे यांनी सांगितले की, बबन कांबळे यांची पत्रकारिता सध्याच्या काळात उठून दिसणारी असल्याने त्यांचे कार्य नेहमी स्मरणात राहील. वंचितांचा आवाज त्यांनी बुलंद केला.
धनराज गोंडाणे, यशवंत भंडारे, बौध्दाचार्य व्ही. के. वाघ, विनय घनबहाद्दूर, आर. बी. वानखेडे यांनी भावपूर्ण शब्दात बबन कांबळे यांच्या कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय भाषणात जेष्ठ नेते रतनकुमार पंडागळे यांनी बबन कांबळे यांच्या आठवणी सांगितल्या, त्याचे मी ऐकलेले एक भाषण अंगावर शहारे आणणारे होते, याचीही आठवण पंडागळे यांनी बोलून दाखविली, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एडीटर्स अॅण्ड प्रेस रिपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रतनकुमार साळवे यांनी केले, आभार प्रदर्शन जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर खंदारे यांनी केले.यावेळी रशपालसिंग अट्टल, ज्ञानेश्वर खंदारे, शांतीलाल गायकवाड, परमेश्वर साळवे, जगन्नाथ सुपेकर, संजय सोनखेडे, चंपालाल दुर्वे, शेख शफिक, बबन सोनवणे, प्रल्हाद गवळी, महेश मुरकुटे, राज ठाकरे, देविदास कोळेकर, सुजित ताजने, नामदेव सावंत, महादेव पंडीत, भाऊसाहेब शेजूळ,उमेश खडसे, धनराज गोंडाणे, सि.पी.पाटील,आदी पत्रकार, समाजबांधव मोठया प्रमाणावर यावेळी उपस्थित होते.