टोमॅटोच्या पिकात लावला चक्क गांजा !
नाशिक (सुवर्ण दिप वृत्तसेवा) चांदवड तालुक्यातील जांबुटके शिवारात टोमॅटोच्या पिकात बेकायदेशीररीत्या लागवड केलेली गांजाची एक लाख ३८ हजार ६५४ रुपये किमतीची ७५ झाडे वडनेरभैरव पोलिसांनी कारवाई करून ताब्यात घेतली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित शेतकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक केली आहे.[ads id="ads1"]
जांबुटके शिवारातील शिवओहळ येथील शंकर बापू बांडे ( वय ५५) यांच्या शेत गट नं. ७२/२ मधील टोमॅटोच्या पिकात गांजाची झाडे लावलेली असल्याची माहिती वडनेरभैरव पोलिसांना मिळताच पोलिसांनी शनिवारी (दि. १९) सायंकाळी घटनास्थळी छापा टाकला. टोमॅटो पिकाच्या आत आडोशाला लावलेली २३ किलो १०९ ग्रॅम वजनाची दोन ते चार फूट उंचीची गांजाची ओली झाडे पोलिसांनी जप्त केली. [ads id="ads2"]
नाशिकचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वडनेरभैरवचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, पोलीस उपनिरीक्षक डोमदेव गवारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दोडे, पोलीस हवालदार आवारे, प्रकाश जाधव, पोलीस नाईक वाघमारे, करडे, चारोस्कर आदींनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयिताविरुद्ध वडनेरभैरव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदवड न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे तपास करीत आहेत.