सांगली :- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, तडसर ता. कडेगाव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि आयडियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. अनिल उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथे *"बेकरी उत्पादन आणि दूध प्रक्रिया तंत्रज्ञान"* या विषयावर तीन दिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये विषय विशेषज्ञ डॉ. दादासाहेब खोगरे यांनी बेकरी उत्पादन आणि दूध प्रक्रिया तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी बिस्किट बनवणे आणि विविध दुधाचे पदार्थ यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर श्री. बसवराज बिराजदार यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचा लाभ घ्यावा असे उपस्थितांना आवाहन केले. उपसंचालक सौ. प्रियांका भोसले यांनी सांगली जिल्ह्याची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सध्याची परिस्थिती याविषयी माहिती दिली.
या प्रशिक्षणादरम्यान श्री. संजीव मुळे, लेखाधिकारी कृषी आयुक्तालय पुणे, श्री. जितेंद्र रणवरे तंत्र अधिकारी, कृषी आयुक्तालय पुणे, श्री. प्रकाश नागरगोजे कृषी अधिकारी सांगली, श्री. बाळासाहेब लांडगे उप प्रकल्प संचालक आत्मा यांनी प्रशिक्षणाला भेट देऊन लाभार्थींना मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी तहसीलदार सांगली डॉ. अर्चना पाटील यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कैलास पाटील यांनी केले तर आभार डॉ. सुनिता पाटील यांनी मानले. प्रशिक्षणासाठी हर्षवर्धन पाटील आणि राजवर्धन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.