आदिवासी विकास विभागाकडून तातडीने केली जाणार 50 हजार रुपयांची मदत
अलिबाग - उरण तालुक्यातील जांभूळपाडा कातकरीवाडी येथे मंगळवार, दि.12 जुलै 2022 रोजी झोपडी कोसळून राम महादू कातकरी या आदिवासी बांधवाचे निधन झाले. या अपघातात त्यांच्या पत्नीलाही दुखापत झाली. या घटनेची माहिती आशा वर्कर सौ.नाईक आणि सुनील नाईक यांनी फोन करून प्रा.राजेंद्र मढवी यांना कळविली.
[ads id="ads1"]
या घटनेची खात्री करून प्रा.राजेंद्र मढवी यांनी जिल्हा आणि तालुकास्तरीय प्रशासनाला सविस्तर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, नायब तहसिलदार आणि त्यांची टीम तातडीने तिथे पोहोचली. आपत्ती व्यवस्थापन विभागात काम केलेले दत्ता गोंधळी आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी देखील घटनास्थळी पोहोचून पीडित कुटुंबाला धीर दिला. याचबरोबर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विकास अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनीही घटनास्थळी तातडीने भेट दिली. त्यांनी मयत राम कातकरी यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून पिडीत कुटुंबाला आदिवासी विभागाकडून 50 हजार रुपयांची तात्काळ मदत करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी महसूल, पोलीस प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन यंत्रणा, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, उरण सामाजिक संस्था, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आणि उपस्थित सर्वांनी मयत राम महादू कातकरी यांच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचा संकल्प केला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या काळात स्वत:ची काळजी घ्यावी. प्रशासन करीत असलेल्या सूचनांचे पालन करावे व कोणत्याही आप्तकालीन प्रसंगी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी तात्काळ साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.