मेहुणबारे - सर्वत्र होणारा विठुरायाच्या नामाचा गजर आणि भक्तीरसाची उधळण या दिवसाचे मांगल्य अजूनच वाढवते. अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा येथे आषाढी एकादशी निमित्ताने शाळेत भव्यदिव्य पंढरपूरच्या वारीचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी विठ्ठलाचे प्रतिरूप म्हणून जयश्री पाडवी आणि रखमाईचे प्रतिरूप म्हणून रोशनी वसावे या विद्यार्थ्यांनी सजीव देखाव्यात सहभाग घेतला. ढोल, मृदंग, टाळ, विनाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. वरूनराजाने लावलेली हजेरी व विद्यार्थ्याचा उत्साह बघता शालेय परिसर भक्तिमय दिसून आला. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांचा पेहराव परिधान केला होता. तर विद्यार्थिनींनी मराठमोळी साडी परिधान करून डोक्यावर तुळशी घेतली होती. या वेळी गावातील महिला, पुरुष पालकांनी ठिकठिकाणी प्रतिरूप विठ्ठल-रखमाईची आरती करून फुलांचा वर्षाव केला. वारीत भजनी मंडळ वारकरी यांचा सहभाग होता. संतोष देवचंद माळी यांच्या भक्ती गीताला दिंडी पताका फडकवून तालावर विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. संस्थेचे अध्यक्ष आणासो राजेंद्र रामदास चौधरी व सचिव विजय रामदास बोरसे यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.