रेल्वेलाईलनवर मृतदेह दिसताच रेल्वे इंजीन लोकोपायलटने रावेर स्थानक अधीक्षकांना वायरलेसवरून संदेश दिल्याने रावेर पोलिसात या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना १३ मार्च रोजी दुपारी ४.३५ वाजता उघडकीस आली.[ads id="ads2"]
या मयत युवकाच्या खिशात आढळून आलेल्या मोबाईल व आधार कार्डवरून त्याचे नाव फैसल ललन अली (रा. हरिहरपूर, ता. बलिया जि. फैजाबाद) असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचे मुंबई येथील काकांशी पोलिसांचा संपर्क झाला होता. सदर युवक हा मुंबईत काकांकडे तीन महिन्यांपासून आला होता. मात्र, आता दहावीची परीक्षा सुरू होणार असल्याने तो मुंबईहून आपल्या गावी परत जाण्यासाठी फैझाबादकडे जात असताना रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा धावत्या रेल्वे गाडीतून पडून मृत्यू झाला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.
याबाबत रावेर रेल्वेस्थानक अधीक्षक आर. के. मीना यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रावेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत चव्हाण यांनी १४ रोजी सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या आप्तेष्टांच्या ताब्यात दिला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. अजय खंडेराव हे करीत आहेत.