अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला लक्झरी बसने मागून ठोकल्याने रावेर तालुक्यातील एकाचा मृत्यू


 अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर नागमोडी वळणे घेत अचानक पुढे आल्याने प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसची त्याला मागून धडक बसली. अचानक घडलेल्या या प्रकाराने बसमधील एक प्रवासी बाहेर फेकला जाऊन त्याचा जागीच मृत्यू आला. औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे ही दुर्घटना घडली. 
[ads id="ads1"] 

वडोद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी, पहाटे पाच वाजेच्या सुमारास औरंगाबादकडून प्रवाशी वाहतूक करणारी ट्रॅव्हल बस क्र.  एम एच ०९ सीए १८१२ ही औरंगाबादहून जळगावच्या दिशेने जात होती. त्याचवेळी आळंद पावर हाऊससमोर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर वळणे घेत रोडवर भरधाव धावत होता. [ads id="ads2"] 

  अचानक हा ट्रॅक्टर समोर आल्याने त्याच्या ट्रॉलीला बसची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात बसच्या समोरील भागाची काच फुटल्याने बसमधील गणेश उमाकांत चौधरी (२९, रा. पूनखेडा, ता. रावेर जि. जळगाव) हा बाहेर फेकला गेल्याने गंभीर जखमी झाला. या अपघातात बसच्या समोरील भागाचे व ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच वडोद बाजार ठाण्याचे दत्ता कोरे, संजय जिवरग यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी गणेश चौधरी यास फुलंब्रीच्या महात्मा फुले रुग्णवाहिकेतून चालक विजय देवम माळी यांच्या साह्याने फुलंब्री येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अंगद घुले यांनी गणेश यास तपासून मृत घोषित केले. या अपघाताची वडोद बाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, सहायक पोलिस निरिक्षक आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दत्ता मोरे पुढील तपास करीत आहेत. 

अपघातामुळे ट्रॉलीतील वाळू रोडवर पसरली होती. सदर ट्रॅक्टर कुणाचा आहे याबाबत माहिती उपलब्ध झाली नाही. या परिसरात अवैध वाळू वाहतूक जोरात असून, चोरट्या मार्गाने भरधाव टॅक्टर अंधारात धावत असतात. त्यांच्या ट्रॉलीला पाठीमागून रेडियम पट्टेही नसतात. त्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. 

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️