सांगली : (विशेष प्रतिनिधी - अँड बसवराज होसगौडर ) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर व क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, तडसर ता. कडेगाव जि. सांगली चे प्रमुख, डॉ. अनिल उलेमाले यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे. तडसर तालुका. कडेगाव या ठिकाणी " महिला दिनानिमित्त महिला मेळावा" आयोजित केला होता. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. दादासाहेब खोगरे यांनी "शाश्वत कृषी व ग्रामीण विकासाकरिता स्त्री-पुरुष समानता" या विषयावर व्याख्यान दिले. महिलांनी सुधारित शेती अवजाराचा वापर शेतीमध्ये करून कमी वेळेमध्ये जास्त काम करता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच महिलांनी नवीन शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये विकास करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्र सूर्यवंशी यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ शेतकरी महिलांनी घ्यावा कसे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, सरपंच, श्री. हनमंतराव पवार यांनी गावातील महिलांनी शेती पूरक व्यवसाय चालू करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सदर महिला मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते टोमॅटो प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आणि कृषी विज्ञान केंद्रामार्फत भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रक्षेत्र व्यवस्थापक श्री. श्रीकांत वडघणे यांनी केले. सदर महिला मेळाव्यासाठी बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संस्कृती पाटील, गणेश पवार, युगंधरा पाटील, सोनाली पाटील, योगेश सरगर, सोनाली जाधव यांनी सहकार्य केले.