नंदुरबार : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही. परंतु कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करून घोडेबाजार 18 ते 27 डिसेंबर, 2021 या कालावधीत भरविण्यास परवानगी असेल. अशी माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे.
[ads id="ads2"]
सारंगखेडा यात्रेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या की, श्रीदत्त जयंतीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करून आवश्यक व्यवस्था करावी, शासनाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार यावर्षी सारंगखेडा यात्रा होणार नाही. पालखी सोहळ्यात भाविकांची संख्या मर्यादीत राहील, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मास्क परिधान करणे, शारिरीक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि हात वारंवार धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.
मंदिरात पारंपरिक विधी आणि भाविकांचे दर्शन सुरू राहील. मंदिर परिसरात केवळ 50 व्यक्तींना एकावेळी प्रवेश द्यावा. दर्शनासाठी इतर भाविकांना टप्प्याटप्प्याने तेथे आणण्याची व्यवस्था करावी. भाविकांना योग्य रांगेत उभे रहाण्यासाठी खूणा करण्यात याव्यात. यात्रेवेळी येणारे भाविक, व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. मंदिराच्या परिसरात व घोडेबाजार परिसरात स्वयंसेवक व सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावण्यात यावेत.
मंदिर प्रशासनाने सायं 7.00 वाजेपर्यंत दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. आरोग्य विभागाने मंदिर परिसराचे दररोज निर्जंतुकीकरण करावे आणि थर्मल स्कॅनरची व्यवस्था करावी. ग्रामपंचायतीने ठिकठिकाणी साबणाने हात धुण्याची व्यवस्था करावी. फुले आणि नारळाच्या दुकानांची संख्या फक्त 5 ठेवावी व अशा दुकानांची माहिती पोलीसांना द्यावी. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था करावी. मंदिर परिसरात त्यांना ठरावीक अंतराने सोडावे. परिसरात नियंत्रण कक्ष स्थापित करून त्यात सर्व संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे.
घोडेबाजाराच्या ठिकाणी बाहेरील राज्यातील घोडे विक्रेता, व्यापारी, तसेच खरेदीदार येत असतात त्यांचे 100 टक्के लसीकरण व कोविड-19 आरटीपीसीआर चाचणी ही 72 तासांच्या आत झालेली आहे किंवा नाही ही बाब प्रामुख्याने पडताळणी केल्याशिवाय त्यांना घोडेबाजारात प्रवेश तथा परवानगी देण्यात येवू नये. मास्कशिवाय कोणासही मंदिरात व घोडेबाजार परिसरात प्रवेश देऊ नये, यांचे उल्लंघन केल्यास कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई करण्यात येईल.
बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा, गट विकास अधिकारी, शहादा पोलीस निरीक्षक, सारंगखेडा पो.स्टे. तसेच विविध विभागाचे अधिकारी आणि सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा आदी उपस्थित होते.