तुटपुंज्या वस्तूंचं वाटप करुन नाही, तर विकासाच्या मूळ प्रवाहात आणले तरच आदिवासींचा शाश्वत विकास होईल” उपमुख्यमंत्री अजित पवार

तब्बल १८३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे केले लोकार्पण आणि भूमिपूजन 

नाशिक वार्ताहर (सुशिल कुवर) “किरकोळ, तुटपुंज्या वस्तूंचं वाटप करुन नाही, तर आदिवासींना विकासाच्या मूळ प्रवाहात आणले तरच आदिवासींचा शाश्वत विकास होईल” हे विचार ए.टी. पवार साहेबांनी अनेक वेळा, अनेक ठिकाणी बेधडकपणे मांडले. नुसते बेधडक विचार मांडून ते थांबले नाहीत, तर आपल्या समाजाचा, आपल्या लोकांचा, आपल्या भागाचा शाश्वत विकास करण्याचा त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न केला. आजचा हा संवाद कोरड्या पध्दतीनं होणार नाही, तर ज्या कळवण-सुरगाणा मतदार संघात विकासाचा ‘एटी’ पॅटर्न राबविला गेला, 
[ads id="ads2"] त्या ठिकाणी तब्बल १८३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आताचं झालं आहे. पूर्वीच्या कळवण मतदार संघाचे तब्बल पंचेचाळीस वर्षे नेतृत्व करणाऱ्या दिवगंत ए.टी. पवार साहेबांना ही महाविकास आघाडी शासनाची द्विवर्षपूर्तीच्या निमित्ताने दिलेली कृतिशील वंदना आहे, असं मी समजतो, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
[ads id="ads1"] ते आज आज नाकोडे ता. दिंडोरी येथील तालुका क्रीडा संकुलात आयोजित कळवण-सुरगाणा विधानसभा मतदार संघातील 183 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसंच शेतकरी, शेतमजुर, आदिवासी, युवक मेळाव्यात संबोधित करताना बोलत होते. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार, माजी आमदार जयंत जाधव, अपूर्व हिरे उपस्थित होते. 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, आपल्या महाविकास आघाडीचं सरकार, राज्यात सत्तेवर येऊन आज दोन वर्षे झाली. या दोन वर्षांच्या काळात, महाविकास आघाडी सरकारला साथ, सहकार्य, पाठिंबा दिलेल्या, सरकारवर विश्वास व्यक्त केलेल्या, राज्यातल्या तमाम बंध-भगिनी-मातांचं, तरुण मित्रांचं, आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. राज्यातल्या जनतेच्या विश्वासावर आणि आशिर्वादावर ‘महाविकास आघाडी’चं सरकार आज यशस्वीपणे दोन वर्षे पूर्ण करत आहे. राज्याच्या विकासासाठी आणि उन्नतीसाठी हे ‘महाविकास आघाडी’चं सरकार कायमचं कटीबध्द राहिल, याची ग्वाही मी यानिमित्तानं आपल्याला देतो. या दोन वर्षात राज्यातल्या जनतेनं दाखविलेला विश्वास आणि केलेलं प्रेम ‘महाविकास आघाडी’ सरकारसाठी मोलाचं आहे, त्याबद्दल सरकारच्यावतीनं आपले आभार मानतो. जनतेचं प्रेम ‘महाविकास आघाडी’ सरकारबरोबर असचं कायम राहिल, याची मला खात्री आहे. या शुभदिनी आज कळवण-सुरगाणा विधानसभा मतदार संघातल्या शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, आदिवासी बांधवांशी, युवकांशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली. त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कळवण-सुरगाणा मतदार संघाच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, याची ग्वाही या निमित्तानं तुम्हा सर्वांना देतो.

ते पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्रलढ्यातलं एक मोठं नाव, आपल्या सर्वांचं दैवत, आद्य क्रांतीकारक, जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याला, शौर्याला, धैर्याला, पराक्रमाला मी, आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं त्रिवार वंदन करतो. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी, स्त्रीयांच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचणारे, क्रांतीसूर्य, महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिनधी आहे. मी त्यांच्या कार्याला, स्मृतीला अभिवादन करतो. साडेतीन शक्ती पिठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी मातेच्या चरणी नतमस्तक होतो. जननायक बिरसा मुंडा यांच्या कार्याला आदर्श मानुन, सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केलेले, महाराष्ट्राच्या राजकारणात, आदिवासी बांधवांच्या विकासाचा स्वतंत्र ‘एटी’ पॅटर्न निर्माण केला, ते आपले नेते, राज्याचे माजी मंत्री, माझे सहकारी, दिवंगत नेते ए. टी. उर्फ अर्जुन तुळशीराम पवार यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. वंदन करतो.

आदिवासी बहुल भागातील नागरिकांनी लसीकरणा वर भर द्यावा: नरहरी झिरवाळ

कोरोनाचा प्रभाव अजून कमी झालेला नाही. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ घायचा असेल तर सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी निर्बंध लावले आहेत. हे निर्बंध आपल्या सर्वांच्या हिताचे असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी नागरिकांना केले आहे. तसेच राज्यातील आदिवासी भागातील नागरिकांच्या वनपट्ट्यात गेलेल्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यावर शासनाने भर द्यावा, असेही विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ यांनी सांगितले.

 या कामांचे झाले लोकार्पण आणि भूमिपूजन...

• राज्य मार्ग ६ रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण (१८ कोटी रुपये)

• राज्य मार्ग ४ रस्त्यांच्या कामांचे भुमिपुजन (१० कोटी १० लाख रुपये)

• प्रमुख जिल्हा मार्ग १५ रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण (१४ कोटी ६९ लाख रुपये) 

• १४ रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन (२३ कोटी ३० लाख रुपये) 

• नाबार्ड अंतर्गत ४ पुलांच्या कामांचे भूमिपूजन (५ कोटी ३१ लाख रुपये)

• आदिवासी विकास विभाग ४६ रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन (१५ कोटी ९० लाख रुपये) 

• शासकीय मुलींची वस्तीगृह, सेंट्रल किचन इमारत ४ कामांचं भूमिपूजन (२० कोटी ८५ लाख रुपये) 

• केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ६ रस्ता आणि पुलाच्या कामांचे भूमिपूजन (७ कोटी २१ लाख रुपये)

• विशेष दुरुस्ती निधी अंतर्गत रस्ता व पुलांच्या कामांचे भूमिपूजन (२ कोटी ८० लाख रुपये)
• विशेष विकासकामे ३ कोटी रुपये.

• मुलभूत सुविधा अंतर्गत कामे रस्ता काँक्रिटीकरण , सभामंडप, स्मशानभुमी आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ( २२ कोटी रुपये.)

• दळवट ग्रामीण रुग्णालय भूमिपूजन (१२ कोटी ५० लाख रुपये) 

• पिंपळे आरोग्य उपकेंद्र भूमिपूजन (७५ लाख रुपये) 
• उंबरगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण (९० लाख रुपये) 

• आरोग्य विभागांतर्गत विकासकामे (३ कोटी ३५ लाख रुपये) 

• जिल्हा परिषद अंतर्गत विकास कामे (७ कोटी ५० लाख रुपचे, ठक्कर बाप्पा योजनेतंर्गत सिमेंट बंधारे २ कोटी रुपये) लोकार्पण. 

• पिंपळे वीज उपकेंद्राचे लोकार्पण (४ कोटी रुपये) 

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️