शाळा ही संचालकाच्या नातेवाईकाचे पोट भरायचे साधन नाही. तसं कोणीही समजू नये. कारण तसे समजून तसे वागल्यास शाळेचा विकास खुंटतो. शाळेला विद्यार्थी मिळत नाही. त्या बंद पडण्याच्या मार्गावर राहतात.
[ads id="ads2"]
अलिकडे हेच चित्र दिसत आहे. ब-याचशा शाळा ह्या ज्या संचालकाच्या आहेत. त्या शाळेत सर्वात जास्त संचालकाचे नातेवाईक आहेत. ते मनमौजीपणानं शाळेत वागत असतात. ते मुख्याध्यापकाचे आदेशही पाळत नाहीत. त्यातच नातेवाईक व संचालकापुढं मुख्याध्यापकाची हार होत असते. मुख्याध्यापक, संचालक व नातेवाईक यांची भांडणं सुरु होतात. विद्यार्थी शिकविण्याकडे लक्ष राहात नाही. विद्यार्थी मागे पडतात. हळूहळू हे पालकांना माहित होते. शेवटी ते आपल्या मुलांना अशा शाळेत टाकत नाही. ते त्या शाळेतून काढून घेतात. यातच ब-याचशा शाळेची पटसंख्या कमी झालेली आहे.
[ads id="ads1"]
शाळा ह्या विद्यार्थी विकासाची माध्यमं आहेत. प्रत्येक पालकाला वाटत असते की माझा मुलगा शाळेत जाईल. उच्च शिक्षण घेईल. त्यासाठीच ते आपल्या पाल्यांना शाळेत टाकत असतात. अशावेळी त्या शाळा जर नातेवाईक संबंध जोपासणा-या असल्या तर पुर्ण शाळेची दाणादाण होत असते.
ब-याचशा शाळा ह्या आजच्या काळात ज्या उघडलेल्या आहेत. त्यात त्या त्या शाळांना सरकारी अनुदानही प्राप्त झालेले आहे. या शाळेत सरकारी अनुदान मिळत असल्यानं ब-याचशा संचालकांनी आपल्याच जवळच्या नातेवाईकांची या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त्या केलेल्या आहेत. त्यांचं पोट भरावं हा दृष्टिकोण लक्षात घेवून. अशा शाळेत असे शिक्षक आपले कर्तव्य विसरुन ते केवळ संचालक जसा वागवेल तसे ते वागत असतात. यातच काही काही संचालक जे नातेवाईक नसतात, त्यांना आपल्या घरचीही कामं करायला लावतात ही वास्तविकता आहे.
अलिकडं आरक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससी, एसटी ओबीसींना आरक्षण मिळवून दिले आहे. त्याच आरक्षणाच्या माध्यमातून आता नाईलाजानं का होईना, एससी, एसटी, ओबींसींना नोक-या मिळत आहेत, पदोन्नतीही. जर आरक्षण नसतं तर त्याही नोक-या आणि पदोन्नत्या एससी, एसटी, ओबीसींना मिळाल्या नसत्या. हेही तेवढंच सत्य आहे. या पाश्वभुमीवर समजा एखाद्या एससी, एसटीला अशा खाजगी संस्थेत नोकरी मिळालीच तर त्या संस्थेत सदरव्हू कर्मचा-याला मोठा त्रास दिला जातो. त्याला संचालकाच्या घरची कामंही करावी लागतात. नाही केल्यास त्याचं निलंबनही केलं जातं. पदोन्नत्या मिळत नाहीत. मुख्याध्यापक असेल तर मुख्याध्यापकांना त्रास दिला जातो. त्याला काम करु दिलं जात नाही.
संचालक हे मुखत्वे आपल्या शाळेत मुख्याध्यापक म्हणून नात्यातीलच व्यक्ती बसवतात. त्यांना इतर व्यक्ती चालत नाही. तसेच इतर व्यक्तीही फालतूचा त्रास आपल्याला नको म्हणून संचालकानं म्हटल्यानुसार संचालकांना लिहून देतात की मला हे पद नको. कारण त्याला माहित असतं की मी जर हे पद घेतलंच तर उद्या हेच शाळेचे नातेवाईक आणि हा शाळा संचालक माझ्यावर विनाकारणचे खोटेनाटे आरोप लावून मला फसवेल. कारण संचालक तसा फसवतोच हे निर्विवाद सत्य आहे.
शाळेत मुख्याध्यापक म्हणून शाळा संचालक हा आपल्या नातेवाईकांचीच वर्णी लावत असतो. तरीही यावर मात करण्यासाठी शाळा संहितेत मुख्याध्यापक नियुक्ती करतांना सेवाजेष्ठता हे तत्व आणलेलं आहे. परंतू असे झाले आणि इतर व्यक्ती मुख्याध्यापक बनलाच तर त्याला त्या शाळेतील संचालकाचे नातेवाईक जगू देत नाहीत. याबाबत एक प्रसंग सांगतो. तो प्रसंग असा आहे.
एक शाळा. त्या शाळेतील विद्यमान मुख्याध्यापक अचानक मरण पावला. त्या जागेवर सेवाजेष्ठता नियमांच्या आधारावर शिक्षणाधिकारी साहेबांनी एका शिक्षकाला मुख्याध्यापक केलं. जो मुख्याध्यापक संचालकाचा नातेवाईक तर नव्हताच. तसेच तो मुख्याध्यापक हा एससी प्रवर्गाचा असल्यानं संचालक महोदयांनाच नाही तर त्या शाळेतील इतर नातेवाईक शिक्षकांनाही चालत नव्हता. मग काय, पत्राचं शितयुद्ध सुरु झालं. नातेवाईक मुख्याध्यापकाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत होते. विनाकारण आरोपाचे पत्रावर पत्र पाठवीत होते. विद्यार्थ्यांना शिकवीत नव्हते. तसेच शाळेत नियमीत येत नव्हते. त्यातच त्या मुख्याध्यापकालाही कामे करणं कठीण झालं होतं.
मुख्याध्यापक हा संचालकाचा नातेवाईक नसल्यानं तो त्याच शाळेतील इतर नातेवाईक मंडळींची मनमौजी खपवून घेवू शकत नव्हता. त्यातच त्यानं विद्यार्थी विकास व शाळेचं हित लक्षात घेवून आपली ध्येयधोरणं राबविण्यास सुरुवात केली.
दिवंगत मुख्याध्यापक हा संचालक महोदयाचा नातेवाईक होता. तो संचालक महोदयाच्या नातेवाईकांचं काही चुकतही असेल तरी त्यांना काही म्हणत नसे. त्यांच्या चुकांवर पांघरुण घालत असे. त्यामुळं शाळा बुडीस निघाली होती. परंतू विद्यमान मुख्याध्यापक हा शाळेतील संचालकांचा नातेवाईक नसल्यानं तो त्या शाळेतील संचालकाच्या नातेवाईकांच्या चुकांवर कसा पांघरुण घालेल. बस तेच त्यांना नको होते. त्यातच संचालक आणि त्याचे नातेवाईक त्या मुख्याध्यापकाला आपले शिकविणे सोडून पत्राच्या फैरीच्या फैरी झाडत असत. याचा परीणाम विद्यार्थ्यावर होत होता. ते मुख्याध्यापकाचे कोणतेच आदेश ऐकत नसत. त्यातच त्या मुख्याध्यापकाला काय करावं आणि काय नको असं होवून जात असे.
शाळा ही काही नात्यातील लोकांचे पोट भरायचे साधन नाही. त्या शाळेला तसे कोणीही समजू नये. समजा शाळेत असे नातेवाईक असलेही, तरी त्यांनी नातेसंबंध पाळू नये. तसेच चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा विचार करावा. मुख्याध्यापकाचे आदेश पाळावे. तसेच संचालकालाही आपल्या शाळेची प्रत टिकवून ठेवायची असेल तर आपल्या शाळेत अशा नातेवाईकांचा भरणा करु नये. जे संचालकाला आपला नातेवाईक समजून मुख्याध्यापकीय आदेश पाळत नाहीत. विद्यार्थी वर्गाला शिकवीत नाहीत. विद्यार्थी विकास घडून येत नाही.
संचालकाने शाळेला शाळेचा दर्जा प्रदान करावा. नातेवाईकांचा भरणा करु नये. कारण शाळेच्या सर्व वर्गखोल्यातून देशाचे आदर्श नागरीक घडत असतात. जे देशाचे आधारस्तंभच नाही तर भवितव्य असतात. ज्यातून कोणी शास्रज्ञ, कोणी पंतप्रधान, कोणी राष्ट्रपती तर कोणी शिक्षक बनतात आणि तसं बनून देशाची सेवा करीत असतात. हे तेवढंच खरं आहे.
अंकुश शिंगाडे नागपूर (९३७३३५९४५०)