मागील वर्षी कोरोनाचा तीव्र प्रादुर्भाव लक्षात घेता ही सभा ऑनलाईन घेण्यात आली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून जनजीवन सामान्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षी ही प्रबोधन सभा आयोजित होईल याचा प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे.[ads id="ads1"]
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या प्रबोधन सभेच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यास प्रारंभ केला असून दि. १२/८/२१ रोजी सभेच्या परवानगीसाठी मा. जिल्हाधिकारी अकोला यांचे कडे रितसर विनंती अर्ज सादर केला आहे.
दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित प्रबोधन सभेतून लोकांचे प्रबोधन होत असते, त्यांचा उत्साह वाढतो, ऊर्जा वाढते, त्यांना संदेश दिला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करत असतात. म्हणून यावर्षी १६/१०/२१ रोजी जाहीर सभेचे आयोजन केले असून त्यासाठी शासनाकडून परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला आहे.
मात्र मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या दिनांक ४/१०/२१ रोजीच्या पत्रानुसार कोविड १९ च्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता परवानगी देता येणार नाही असे कळवून सभेला परवानगी नाकारली आहे.
वास्तविक पाहता सद्य परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे खुली झालेली आहेत. सर्व व्यवहार सुरळीत झाले असून परिस्थिती सामान्यसदृश्य आहे. तसेच नुकत्याच अकोला जिल्हा परिषदेच्या व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका पार पडल्या. त्यामध्ये निवडणूक प्रचारार्थ रॅल्या, सभा झालेल्या आहेत. तेव्हा कोविडची तिसरी लाट नव्हती काय? आमच्याच सभेला परवानगी का नाही असा जनमानसात भावनिक रोष निर्माण झालेला आहे.
देशातील इतर राज्यामध्ये मोठमोठ्या सभा होत आहेत. आपल्या राज्यात देखील सभा सदृश्य कार्यक्रम होत आहेत. म्हणून अकोला येथील पारंपारिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम व्हावा अशी जनसामान्यांची भावना आहे. त्यासाठी समाज आतुर झाला आहे. परंतु शासनाने परवानगी नाकारल्यामुळे जनमानसात असंतोष निर्माण झाला आहे. त्यांच्या भावनेचा विचार करता सभेला परवानगी मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे सभेला परवानगी मिळावी यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा अकोला उच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेत आहे.