गृहविभागाने रायगडसाठी झुकते माप द्यावे
सागरी मार्ग, राष्ट्रीय महामार्गावरील चौक्या, पोलिस वसाहतीसाठी अधिक निधीची तरतूद करण्याची विनंती -पालकमंत्री कु.आदिती तटकरे
अलिबाग,जि.रायगड - कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातील पोलिसांना अहोरात्र तत्पर राहावे लागते. यासाठी पोलिसांना त्यांच्या कार्यालयाजवळच निवासस्थान असणे गरजेचे आहे. यासाठी राज्यातील 80 टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देण्याकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष केंद्रीत केले असून अर्थसंकल्यात 700 कोटींची तरतूद केली आहे.
[ads id="ads1"]
आगामी वर्षात या तरतुदीमध्ये वाढ केली जाणार असून पोलिस गृह निर्माण कल्याण महामंडळ व नगर विकास खात्यामार्फत पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांनी महाड येथील पोलिस निवासी संकुलाच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले.
महाड येथे उभारण्यात आलेल्या 108 फ्लॅटची व्यवस्था असणाऱ्या निवासी संकुलाचे आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभुराजे देसाई हे ऑनलाईन उपस्थित होते तर पालकमंत्री ना. आदिती तटकरे कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून तर विशेष अतिथी म्हणून खासदार सुनिल तटकरे, आमदार भरतरशेठ गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, पोलिस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, अप्पर पोलीस महासंचालक श्री.संजय वर्मा, [ads id="ads2"] पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसाळकर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर , कोकण परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते .
ना. दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस दलाच्या सर्वांगिण विकासासाठी सरकार कटिबद्ध असून पोलिस दलात नवीन भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. सागरी सुरक्षा व वाहतूक सुरक्षा तसेच महिला, बालक व वृद्धांची सुरक्षा यासाठी पोलिसांना प्रभावीपणे काम करायचे असून कायदा व सुरक्षेत कुठलीही दिरंगाई मान्य नाही, असे सूचित केले. पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना सौजन्याची वागणूक मिळायला हवी. पोलिस आणि जनतेची मैत्री होईल, त्यावेळीच आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकू, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री कु. आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळेच महाड मधील पोलिस निवासी संकुलाचे लोकार्पण होत आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील पोलिस गृहसंकुल व पोलिस ठाण्याच्या इमारती उभारण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी यावेळी दिले.
गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोलिस दलाकडे विशेष लक्ष असून पोलिसांना घरांची व्यवस्था चांगली असावी, यासाठी ते आग्रही असल्याचे सांगितले. पोलिस गृह संकुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे न देता गृह निर्माण संस्थेप्रमाणे त्यांची स्वतंत्र तरतूद असावी, अशी सूचना केली.
पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी रायगडच्या पोलिस युनिटने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केली असून या दलाची कामगिरी भविष्यात सर्वोत्तम राहण्यासाठी गृह खात्याने रायगडला झुकते माप द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत सागरी मार्ग, राष्ट्रीय महामार्गावरील चौक्या, अलिबाग मधील पोलिस वसाहतीसाठी अधिक निधीची तरतूद करावी, अशी विनंतीवजा मागणी केली. तसेच येत्या दि. 11 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा, असे महिला वर्गाला आवाहन करीत पावसाळ्यातील 4 महिने महाड येथे पोलिस कंट्रोल रूम कार्यान्वित ठेवण्यात येईल, अशी घोषणाही केली.
यावेळी खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी तर आभार सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांनी मानले.