[ads id ='ads1]
कृषि निर्यात धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पिकनिहाय क्लस्टर गठीत
वर्धा - देशातील कृषि मालाची निर्यात वाढविण्याचे दृष्टीने केंद्र शासनाच्या कृषि निर्यात धोरणाच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय सुकाणू समिती’ व क्लस्टर स्तरावर संबंधित शेतमालाचे सर्वात जास्त उत्पादन असलेल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली क्लस्टरनिहाय ‘क्लस्टर फॅसिलिटेशन सेल’ गठीत करण्यात आले आहे. एकूण 27 क्लस्टरमधील केळी व संत्रा क्लस्टरमध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून आता वर्धा जिल्ह्यातील उत्तम दर्जेदार केळी निर्यात होणार असून येथील केळी उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठा लाभ होणार आहे.
वर्धा जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर ठरावा म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळीच्या शेतीचे कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व विक्री व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनाकडून सहाय्य करण्यात येणार आहे. जिल्ह्यातून केळी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासोबतच केळी लागवडीकडे शेतकऱ्यांना वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे केळी क्लस्टर फॅसिलिटेशन सेलचे अध्यक्ष राहणार असून संबंधित शेती उत्पादन घेणारे जिल्हे क्लस्टरमध्ये समाविष्ट राहतील. तसेच संत्रा क्लस्टरसाठी अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असणार आहेत.
जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी सेलु तालुक्यात केळी फळपिकाचे भरघोस उत्पादन घेण्यात येत होते. तालुक्यातील केळी ही उत्तम दर्जाची असल्यामुळे या ठिकाणाहून राज्यात सर्वत्र केळी विक्रीसाठी पाठविली जात होती. एवढेच नव्हे तर येथून केळी लागवडीसाठी कंद सुद्धा इतर जिल्ह्यात पाठविण्यात येत होते. सद्यस्थितीत जिल्ह्यात केळी लागवडीचे क्षेत्रफळ 243 हेक्टर असून सेलू तालुक्यासह इतर तालुक्यांतही केळी उत्पादन वाढीसाठी कलस्टरनुसार महत्वपूर्ण काम हाती घेण्यात येणार आहे.
क्लस्टरनिहाय क्लस्टर फॅसिलिटेशन सेलमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक, जिल्हा उपनिबंधक, राष्ट्रीय संशोधन केंद्र, संबंधित कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी तसेच संबंधित पिकाचे उत्पादन घेणारे प्रगतशील शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी आदी सदस्य राहणार आहेत.
जिल्हा पुन्हा केळी उत्पादनात अग्रेसर ठरेल - अनिल इंगळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा
जिल्ह्यात 20 वर्षापूर्वी सेलू तालुक्यात केळी पिकाचे भरपूर उत्पादन होत होते. पंरतु, कालांतराने केळीच्या पीकाकडे कल कमी झाल्याने केळी उत्पादनात जिल्हा माघारला. केळीच्या लागवडीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण व जमीन आहे तसेच येथील केळी दर्जेदार असल्यामुळे निर्यातक्षम आहेत. जिल्ह्यात केळीसाठी नवीन केळीचे ‘क्लस्टर फॅसिलिटेशन सेल’ उभारणी होत असल्याने जिल्हा पुन्हा केळी उत्पादनात अग्रेसर ठरेल.