...या जिल्ह्यात धार्मिक स्थळे आणि प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी





नंदुरबार - कोविड-19 च्या अनुषंगांने शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळे सुरु करण्यास 7 ऑक्टोंबर पासून जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी परवानगी दिली आहे. 
[ads id='ads1]

प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधीत विश्वस्त, मंडळ, घटना व्यवस्थापक यांनी निर्णय घ्यायचा आहे. धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मास्क परिधान करणे, शारिरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील.


प्रतिबंधीतक्षेत्रातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे ही नागरिकांसाठी बंद राहतील. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असतात अशा ठिकाणाच्या आवारात कामगार, सेवेकरी, अभ्यागत, भाविक यांनी कोविड 19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. 


65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, इतर आजाराने ग्रस्त व्यक्ती, गरोदर महिला आणि 10 वर्षांखालील लहान मुले यांनी घरीच रहावे. धार्मिक, प्रार्थना स्थळांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था यांनी नागरिकांना याबाबत सूचना द्याव्यात.याठिकाणी कमीत कमी 6 फुट शारिरिक अंतर राखणे आवश्यक असेल. येणाऱ्या सर्व नागरिक, कामगार, भाविक, सेवेकरी यांनी स्वत:च्या आरोग्याचे निरिक्षण करणे तसेच आजारी असल्यास स्थानिक प्रशासनास कळविणे आवश्यक राहील. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास पूर्णपणे प्रतिबंध असेल. सर्वाना आरोग्य सेतू ॲपचा वापर करणे आवश्यक असेल.


धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळी करावयाच्या उपाययोजना

सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी प्रवेशद्वारावर हात स्वच्छतेसाठी सॅनिटायझर तसेच थर्मल स्क्रिनिंगची सोय करणे बंधनकारक असेल. सदर ठिकाणी कोरोनाची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश असेल. प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत, तसेच संसर्ग रोखण्याबाबतच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना ऑडीओ व व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृतीसाठी संदेश प्रसारित करावे.


निश्चित केलेल्या वेळेमध्ये किती लोकांना प्रवेश दिला जावा याबाबतचा निर्णय धार्मिक, प्रार्थना स्थळांचा आकार, वायुविजन इत्यादी बाबी विचारात घेवून त्या स्थळांचे नियमन करणारे विश्वस्त, मंडळ, अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन करावे.


चप्पल, बुट, पादत्राणे स्वत:च्या गाडीतच ठेवणेबाबत भाविकांना प्रवृत्त करावे. गरज असेल तर भाविकांनी वैयक्तिक, कुटुंबांची पादत्राणे एकत्र नेमून दिलेल्या ठिकाणी ठेवावीत. वाहन पार्किगच्या ठिकाणी तसेच परिसराबाहेर सामाजिक अंतराच्या निकषाचे पालन करुन गर्दीचे योग्य व्यवस्थापन करावे. परिसरातील सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटेरिया या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करावे. 


प्रार्थना स्थळांच्या परिसरामध्ये भाविकांच्या रांगांचे योग्य व्यवस्थापन करावे आणि योग्य सामाजिक अंतराचे पालन करण्यासाठी योग्य चिन्हांकन करावे. परिसरात स्वतंत्र प्रवेश व बाहेर जाणाऱ्या मार्गाची व्यवस्था करावी. प्रवेश करण्याअगोदर हात व पाय साबण व पाण्याने धुवावेत. वातानुकूल यंत्र, वायुविजनसाठी (CPWD) च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात यावेत. वातानुकुलित यंत्रणांचे तापमान 24 ते 30 से.पर्यत राखले जाईल तसेच सापेक्ष आर्द्रता 40-70 टक्के पर्यत असावी, शक्यतोवर पुरेशी ताजी हवा, क्रॉस व्हेन्टीलेशनची पुरेशी व्यवस्था करावी. धार्मिक स्थळाच्या ठिकाणी तसेच परिसरात स्वच्छता व निर्जतुकीकरण करावे. विशेषत: शौचालय, हात पाय धुण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी विशेष लक्ष दिले जावे.


पुतळे, मुर्ती, पवित्र पुस्तके यांना स्पर्श करण्यास परवानगी असणार नाही. प्रसाद वितरण किंवा पवित्र पाणी शिंपडणे इत्यादी सारख्या कृतीस परवानगी असणार नाही, तसेच सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास परवानगी असणार नाही. भक्ति संगीत, गाणी वाजविली जावीत. परंतू कोणत्याही परिस्थितीत गाण्यासाठी एकत्र येणाऱ्या व्यक्तींना परवानगी असणार नाही. एकमेकांना अभिवादन करताना शारिरिक संपर्क टाळण्यात यावा. प्रार्थनेसाठी एकत्रित येवून एकच चटई, जमखाना वापर करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. भाविकांनी त्यांची स्वतंत्र चटई किंवा जमखाना आणावा आणि प्रार्थनेनंतर ते परत घेवून जावे.


धार्मिक स्थळांच्या ठिकाणी अभ्यागत, भाविक, सेवेकरी, कर्मचारी यांनी वापरलेले मास्क, चेहरापट्टी, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावावी. याठिकाणी काम करणारे कर्मचारी, सेवेकरी यांना कोविड सुरक्षा प्रोटोकॉल गरजेचा असेल त्याचबरोबर कामावर येणे अगोदर तसेच आठवड्यातून एकदा कोविड-19 चाचणी करणे आवश्यक असेल.खाण्याच्या तसेच शौचालयाच्या ठिकाणी गर्दी नियंत्रण करणे आवश्यक राहील. प्रत्येक धार्मिक, प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींची संख्या, जागा आणि सामाजिक अंतराचा प्रोटोकॉल पाळला जाईल याबाबत संबंधीत पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांना हमीपत्र देणे बंधनकारक असेल.


आवारात बाधित किंवा संशयित रुग्ण आढळल्यास आजारी व्यक्तीला इतरापासून दूर स्वंतत्र किंवा जागेत ठेवावे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करेपर्यंत सदर व्यक्तींस मास्क,चेहरा पट्टीचा वापर करणे बंधनकारक राहील.त्या व्यक्तिबाबत तात्काळ वैद्यकीय सुविधा केंद्रात तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनास माहिती कळवावी. सदर रुग्ण कोविड विषाणू बाधित आढळल्यास संपुर्ण परिसर निर्जतुकीकरण करण्यात यावा.


 सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️