वाशिम - राज्य निवडणूक आयोगाने वाशिम जिल्हा परिषद व त्या अंतर्गत सहा पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम २२ जून २०२१ रोजी जाहीर केला होता. त्यानंतर ९ जुलै २०२१ पासून या पोटनिवडणूक कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली होती. [ads id='ads1]
आता १३ सप्टेंबर रोजी आयोगाने वाशिम जिल्हा परिषद व सहा पंचायत समित्यांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून संबंधित क्षेत्रात निवडणुकीची आचारसंहिता पुनश्च लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिली आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे १४ निवडणूक विभाग व सहा पंचायत समित्यांच्या २७ निर्वाचक गणांच्या पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार २१ सप्टेंबर २०२१ रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल.
नामनिर्देशनपत्रांचा स्वीकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध २४ सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील करता येईल
२७ सप्टेंबर २०२१ पर्यंत जिल्हा न्यायाधीश या अपिलावर सुनावणी घेवून निकाल देतील. जिल्हा न्यायाधीशांनी अपील निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी २७ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
जेथे अपील नाही, अशा ठिकाणी २७ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. जेथे अपील आहे, अशा ठिकाणी २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची कार्यवाही करता येईल. जेथे अपील नाही, तेथे २७ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निशाणी वाटप केले जाईल.
जेथे अपील आहे, तेथे २९ सप्टेबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजेनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून निशाणी वाटप केले जाईल. ५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल, तर मतमोजणी ६ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वा. पासून होईल. ८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत निवडणूक आलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध केली जातील.