वाघबाधित क्षेत्रात नागरीकांनी पुढिल १५ दिवस जंगलात जावू नये ; गडचिरोली जिल्हा समन्वय सभेत जिल्हाधिकारी यांचे आवाहन

(छायाचित्र - संग्रहित)

गडचिरोली - गेल्या काही दिवसांमधे गडचिरोली तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिक वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत वनविभागासह इतर सर्व शासकीय विभाग एकमेकांच्या समन्वयातून वाघाला बंदिस्त करण्यासाठी उपाययोजना राबवित आहेत. याकरिता नागरिकांनी पुढील १५ दिवस जंगलात जावू नये असे आवाहन जिल्हाधिकारी संजय मिणा यांनी केले आहे. 
[ads id='ads1]

आज जिल्ह्यातील नरभक्षक वाघावरती नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समन्वय सभा बोलविली होती. यामध्ये वनविभाग, पोलीस, जिल्हापरिषदेसह महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या बैठकीत नागरिकांनी जंगलात न जाता पुढील १५ दिवस वनविभागाला सहकार्य करणे आवश्यक असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 
यावेळी जिल्हाधिकारी यांनी गावांगावात दवंडी द्वारे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत यांचेद्वारे नागरिकांना माहिती देण्याच्या सूचना केल्या. याबाबत येत्या १५ दिवसात नागरिकांचे काही नुकसान होत असेल तसेच गुरांना चारा उपलब्धतेबाबत अडचण असेल तर याबाबत वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 


वनविभागाकडून याबाबत नुकसानभरपाई तपासणी करुन संबंधित गावातील नागरिकांना देण्यात येणार आहे. प्रत्येक गावांगावात वनविभागात नेमलेले ५ सदस्यीय गट याबाबत कार्यरत आहेत. याला प्राथमिक प्रतिसाद गट (PRT) असे म्हणतात. गावातील कोणत्याही व्यक्तिला वाघ दिसला तर त्यांनी गावातीलच त्या सदस्यांना तात्काळ कळविणे आवश्यक आहे. तसेच सद्या वाघबाधित क्षेत्रात वन विभागाच्यावतीने दिडशेहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.

 गडचिरोली तालुक्यातील चुरचुरा, दिभना, गोगाव, जेप्रा, पिपळ टोला, नवरगांव, दिलोडा, अमिर्झा, बोथेडा या गावांमधील व या गावांच्या जवळील सर्व १५ गावांना जंगलामध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. वनविभागाने वाघाच्या शोधासाठी ५० कॅमेरे लावले आहे, रॅपीड रिस्पॉन्स पथक वाघाला पकडण्यासाठी आले आहे. शुटरची मदत यासाठी घेतली जात आहे. तसेच ड्रोन कॅमेराचा वापरही वाघाच्या शोधासाठी करणेत येत आहे.
 
  
जिल्हाधिकारी यांनी वाघाच्या बंदोबस्तासाठी बोलविलेल्या समन्वय सभेला अपर पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, उपविभागीय अधिकारी, गडचिरोली आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी वडसा विशाल मेश्राम, उपवनसंरक्षक गडचिरोली कुमारस्वामी, उपवनसंरक्षक वडसा धर्मवीर सालविठ्ठल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर, मानद वन्यजीव रक्षक, गडचिरोली वनविभाग मिलींद उमरे, विभागीय व्यवस्थापक, ब्रम्हपूरी वन प्रकल्प विभाग श्रीमती आदिती भारव्दाज, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.

जाहिरात


Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️