आदिवासी विकासासाठी मुली व महिलांच्या शैक्षणिक योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नांदेड : राज्यातील आदिवासी क्षेत्राला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे. ज्या प्रमाणात मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढेल त्या प्रमाणात आदिवासी भागातील महिलांचा विविध विकास योजनेत कृतिशील सहभाग घेता येईल. या दृष्टीने पेसाअंतर्गत आदिवासी विकासासाठी असलेल्या योजनांना अधिक लोकाभिमुख करुन प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवाव्यात असे निर्देश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले. नांदेड येथील मिनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
[ads id='ads1]
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, किनवटचे सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी पुरेशी सिंचन व्यवस्था आणि कृषिक्षेत्राला इतर व्यवसायाची जोड असणे आवश्यक आहे. त्यादृष्टिने जिल्ह्यात सिंचनाचे प्रलंबित असलेले प्रकल्प लवकर मार्गी लागल्यास शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उच्च कृषि तंत्रज्ञानाला चालना दिली पाहिजे. यात बाजारपेठेतील कृषि उत्पादनांना अधिक विश्वासर्हता निर्माण व्हावी यादृष्टिने जीओ टॅग व ग्लोबल गॅप सारख्या प्रणालींचा अधिकाधिक भर देणे आवश्यक असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील विविध विकासयोजनांची माहिती राज्यपालांना सादर केली. जिल्ह्यातील पाणंद रस्ते विकास, गाव तेथे स्मशानभूमी, विकेल ते पिकेल, वृक्षलागवड, माझे गाव सुंदर गाव, सामाजिक न्याय आदी विभागातर्फे राबविलेल्या योजनांबद्दल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी समाधान व्यक्त केले. हाती घेतलेली कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत याचा ध्यास शासकिय अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे. नांदेड हा केळीसाठी ओळखला जातो. केळीच्या वाहतुकीसाठी किसान रेलच्या दृष्टीने अधिक विचार करण्याचे त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना सांगितले.

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️