अकोला - राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय व गावस्तरीय समित्या लवकरात लवकर कार्यरत कराव्या, तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा अकस्मात भेटी देऊन कारवाई करावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.
[ads id='ads1]
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा समन्वय समितीची सभा (दि. २९) आयोजित करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पवार, अन्न व औषध विभागाचे सहा. आयुक्त तेरकर, पोलीस विभाग प्रतिनिधी पो.नि. श्रीमती. इतापे, म.न.पा. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर मुद्गल, शिक्षण विभागाचे अरविंद जाधव, नंदकिशोर लहाने, समितीचे अशासकीय सदस्य प्रा.मोहन खडसे, प्रा.डॉ. संकेत काळे, प्रा.डॉ. राजेन्द्र पाटील, डॉ. योगेश शाहू, डॉ. दुष्यंत देशपांडे उपस्थित होते.
यावेळी खंडागळे यांनी निर्देश दिले की, शासकीय / निमशासकीय कार्यालयामध्ये तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थ खाणे व खाऊन थुंकण्यावर प्रतिबंध घालण्याकरीता तंबाखू नियंत्रण ( कोटपा २००३) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता धाडसत्र राबवावे. सध्या सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये सुद्धा तंबाखुजन्य पदार्थाच्या दुष्परिणामाबाबतीत जनजागृती करण्यात यावी.
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष व शिक्षण विभागाचा ऑनलाईन जनजागृतीचा संयुक्त उपक्रम पूर्ण केल्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी खंडागळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.प्रिती कोगदे यांनी कार्यक्रमाचा सविस्तर आढावा सादर केला तर समुपदेशक डी. एम. शिरसाट यांनी प्रास्ताविक केले.