जळगाव - आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, नाशिक विभागांर्तगत पेठरोड, नाशिक, पिंप्रीसद्दोदिन ता. इगतपूरी, नंदुरबार, अजमेर सौंदाणे, ता. बागलाण, मवेशी, ता. अकोला, पिंपळनेर, ता. साक्री जि. धुळे, टिटवे, डोगरसांगळी, चणकापुर, शिंदेदिगर, धडगाव, अक्क्लकुवा, येथे सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6 वी मध्ये तसेच इयत्ता 7 वी ते 9 च्या वर्गातील विद्यार्थी अनुशेष भरुन काढण्यासाठी अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत.
[ads id='ads1]
अनुसूचित जमातीमधील जे विद्यार्थी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 5 वी उत्तीर्ण झालेले आहे व सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इ. 6 वीच्या वर्गात प्रवेशित आहे. तसेच इयत्ता 7 वी ते 9 वी मध्ये प्रवेश घेणार आहेत. अशा इच्छूक विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत संगणक प्रणालीचा अवलंब करुन ऑनलाईन प्रवेश अर्ज https://admission.emrsmaharashta.com या वेबलिंक वर भरावा. ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्याचे रजिस्ट्रेशन करण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टल मधील स्टुडंट आय डी. (19 अंकी) माहिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावे.
प्रवेशाकरीता विद्यार्थ्याची निवड गुणानुक्रमांनुसार करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2021 पर्यंत असुन त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. प्रवेश अर्ज शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळा व इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेले इ. 5 वी पास ते 9 वी च्या विद्यार्थ्यांकरीता पूर्णत: खुली आहे.
तथापी, विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक कमाल उत्पन्न रुपये सहा लाखाच्या आत असावे व पालक शासकीय व निमशासकीय नोकरीत नसावे. अर्जासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेला पालकांच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच पालकांचा अचुक पत्ता ज्यामध्ये रहिवासाचे गाव, तालुका जिल्हा व भ्रमणध्वनी क्रमांक यांचा उल्लेख करावा.
जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. अस आवाहन विनीता सोनवणे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.