अलिबाग,जि.रायगड - अलिबाग तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड व जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रात जनावरांमध्ये लंपी स्किन डिसिज (Lumpy Skin Disease) या साथरोगाचा प्रादूर्भाव आढळून आला असून या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
[ads id='ads1]
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती रायगड श्रीमती निधी चौधरी यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 झिराड कार्यक्षेत्रातील आवास व किहीम तसेच जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अलिबाग कार्यक्षेत्रातील वरसोली (epicenter) या संसर्ग केंद्रापासून 10 कि.मी. परिसर हा बाधित क्षेत्र (infected zone)म्हणून घोषित केला आहे. तसेच बाधित क्षेत्रातील जनावरांच्या शेडचे निर्जंतुकीकरण करून 10 कि.मी. परिघातील परिसरात जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
[ads id='ads2]
प्रादूर्भाव भागातील जनावरांच्या व त्यांच्या संपर्कातील माणसांच्या हालचालींवर बंधने आणण्याच्या तसेच प्रादूर्भाव भागातील 10 कि.मी. परिघातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शन इत्यादीवर बंदी आणण्याच्या दृष्टीने वरील 10 कि.मी. परिघातील गाव परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.
बाधित क्षेत्रातील 5 कि.मी. परिसरातील सर्व जनावरांना गोट पॉक्स लसीकरण तात्काळ करण्यात यावे, याकरिता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के, सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय व जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी योग्य ते नियोजन करून जनावरांचे 100% लसीकरण तातडीने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तसेच जिल्हा प्रशासनाकडून जनावरांसाठी करण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष मस्के व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बंकट आर्ले यांनी केले आहे.