पावसाने दिली जरी ओढ ; शेतकऱ्यांनो नका लावू जीवाला घोर...कर्जत प्राथमिक कृषी केंद्राचा मौलिक सल्ला...

विशेष लेख : पावसाने खंड दिल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झालेला आहे. काही ठिकाणी भात पिकाची लावणी खोळंबली. अपुऱ्या पाण्यामुळे काही ठिकाणी जमिनीला भेगाही पडल्या आहेत. रोग व किडींचा प्रादूर्भाव झाल्यास काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परंतु जीवाला घोर लावून न घेता शेतकऱ्यांनी प्राथमिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथील विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने यांनी दिलेल्या मार्गदर्शक सल्ल्याचा उपयोग करावा. हे मार्गदर्शन शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
[ads id='ads1]
      भात रोपवाटिकेत ताण बसत असल्यास बाह्य स्रोतातून (विहीर /बोअर.. इ) पाणी देण्याची व्यवस्था करावी. तसेच पुनर्लागवड केलेल्या भात खाचरामध्ये पहिल्या 30 दिवसापर्यंत पाण्याची पातळी 2.5 ते 5 से.मी.पर्यंत गरजेनुसार बाह्यस्रोतातून पाण्याची उपलब्धता करून नियंत्रित करावी.
        पुढील काही दिवस जिल्ह्यातील पावसाचा अंदाज घेऊनच भात लागवडीची कामे हाती घ्यावीत. शक्य असल्यास बाह्य स्रोतातून पाण्याची उपलब्धता करून भात पुनर्लागवड करावी अन्यथा पुढे ढकलावी.
       पुनर्लागवड केलेल्या भात खाचरामध्ये लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने किडीच्या प्रादूर्भावाचे निरीक्षण करावे. त्याच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरीफॉस 1.5 टक्के भुकटी वारा शांत असताना धुरळावी. शेतातील बांध तणमुक्त ठेवावे. 
       पाणथळ भागातील भात पिकावर खाचरात पाणी साचून राहिल्यामुळे सुरळीतील अळीचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्याने किडीच्या प्रादूर्भावाचे सातत्याने निरीक्षण करावे. त्याच्या नियंत्रणासाठी बाहेरून पाणी उपलब्ध करणे शक्य असल्यास भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. नंतर कीडग्रस्त पिकावर एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात व नंतर शेतात नवीन पाण्याची साठवण करण्याची व्यवस्था करावी.
[ads id='ads2]
      भात पिकावर कोडकिडीचा आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव पुनर्लागवडीनंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेत दिसून येतो. खोडकिडीच्या व्यवस्थापनासाठी कारटॅप हायड्रोक्लोराईड 4 टक्के दाणेदार 7.5 किलोग्रॅम किंवा क्लोरनाट्रोनीलिपोल 0.4 टक्के दाणेदार 4 किलोग्रॅम किंवा फिप्रोनील 0.3 टक्के दाणेदार 8.3 किलोग्रॅम प्रती एकर या प्रमाणात दाणेदार कीटकनाशकाची पहिली मात्रा पुनर्लागवडीपूर्वी 2-3 दिवस अगोदर जमिनीत पुरेसा ओलावा असताना रोपवाटिकेमध्ये द्यावी.

    नागली, वरी रोपवाटिकेत लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास वर नमूद केल्याप्रमाणेच नियंत्रण करावे.  नारळाच्या लहान रोपांवर कोंब कुजव्या रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास नियंत्रणासाठी कुजलेला कोंब साफ करून त्यामध्ये 1 टक्का बोर्डो मिश्रण मिसळावे.
    नारळावर गेंड्या भुंग्याचा प्रादूर्भाव शेंड्यामध्ये येणाऱ्या नवीन कोंबावर दिसून येतो. या भुंग्याची पैदास शेणखतांच्या खड्डयाजवळ होत असल्याने बागेजवळ शेणखताचे खड्डे असल्यास अशा खड्ड्यात दर दोन महिन्यांनी 1.5 टक्का क्लोरोपायरीफोसची भुकटी मिसळावी. बागेमध्ये 2×2×2 फूट आकाराचे फसवे खड्डे प्रती एकरी 4 खोदावे, त्यात शेणखत भरून ठेवावे व शेणखतामध्ये 1.5 टक्का क्लोरोपायरीफॉस भुकटी मिसळावी. त्यामुळे मादी भुंग्यानी घातलेल्या अंड्यातून बाहेर येणाऱ्या अळ्यांचा नाश होईल. बाग स्वच्छ ठेवावी व किडींच्या सर्वेक्षणासाठी बागेत गेंड्या भुंग्याचा गंध सापळा बसवावा.

     पावसाची उघडीप असल्याने भेंडी व अन्य वेलवर्गीय भाजीपाला पिकावर गोगलगाईचा प्रादूर्भाव दिसून आल्यास गोगलगाई गोळा करून 10 टक्के मिठाच्या द्रावणामध्ये टाकून नष्ट कराव्यात. प्रादूर्भाव जास्त असल्यास नियंत्रणासाठी 8 टक्के रिठाचे द्रावण 800 ग्रॅम रिठा भिजतील इतक्या शक्यतो गरम पाण्यात भिजत घालून 6-7 तासांनी भिजलेल्या रिठयाचे द्रावण वस्त्रगाळ करून प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून भाजीपाला रोपांवर तसेच शेतातील बांधावरील गवतावर फवारणी करावी. (सदर रिठयाच्या द्रावणाची फवारणी नागली पिकावर करू नये )
.
         वांगी, मिरची, टोमॅटो, वेलवर्गीय भाजीपाला पिकावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून रोपांच्या बुंध्याशी आळवणी करावी. पुनर्लागवड करतेवेळी डायमिथोएट 1 मिली प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवावी. लागवड सरी वरंब्यावर 60 × 60 सेमी किंवा 90×60 सेमी अंतरावर करावी. लागवडीच्या वेळी 750 ग्रॅम चांगले कुजलेले शेणखत, 4 ग्रॅम युरिया, 11 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 3 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सुफला 15:15:15 खते द्यावयाची असल्यास 10 ते 12 ग्रॅम प्रति रोप याप्रमाणे खताची मात्रा द्यावी.

         काकडी, दोडका, कारले, दुधीभोपळा,घोसाळे यासारख्या वेलवर्गीय पिकांची लागवड करून 10-12 दिवसांनी बुरशीजन्य रोग टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मुळावर चूळ भरावी तसेच वेलींना योग्य आधार द्यावा व वेलवर्गीय पिकावर रसशोषक किडींचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकरी 20-25 पिवळ्या, निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावे.

काळीमिरीच्या वेलीवर करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास कार्बन डाजियम 1 ग्रॅम प्रति एक लिटर पाण्यात मिसळून उघडीप असताना फवारणी करावी.
पावसाळ्यात मोगरा व सोनचाफा फूलपिकामध्ये मूळकूज रोगाचा प्रादूर्भाव दिसून आल्यास ट्रायकोडर्मा 2 किलोग्रॅम प्रति एकर या प्रमाणात झाडाच्या मुळाशी आळवणी करावी.

      नवीन फळबाग (आंबा, चिकू, काजू ) कलम लागवडीनंतर पानांवर अळीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास त्यासाठी डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 1.5मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.

       बुरशीजन्य रोगामुळे होणाऱ्या चिकू फळगळतीच्या नियंत्रणासाठी बाग स्वच्छ ठेवावी, हवा खेळती राहील व सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचेल, असे बघावे. झाडाच्या भोवती ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक 2 किलोग्रॅम प्रति एकर प्रमाणात झाडाभोवती द्यावे आणि मँटलेकाजिल + म्यानकोझेब  2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी गोठे स्वच्छ, हवेशीर व कोरडे ठेवावे. शेळ्यांना सर्वसाधारण एका वेळी 200 ते 250 ग्रॅम खुराक, 3 ते 4 किलो हिरवी वैरण आणि 1.5 किलो वाळलेली वैरण प्रतिदिन द्यावी.
डॉ रवींद्र मर्दाने
विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ, उत्तर कोकण किनारपट्टी विभाग,प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत

जाहिरात

Suvidha Online Raver


 


SuvarDip News Android App
⬆️ येथे क्लिक करून Download करा ⬆️