सातारा : जिल्ह्यात सद्य:स्थितीत पश्चिम भागात जोरदार अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील सर्व धरातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा जिल्ह्यात पुढील काही दिवस अतिवृष्टी होणार आहे.
सातारा जिल्ह्यात सध्या चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणी भूस्खलन झाले आसून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्त हानी झालेली आहे. सद्य:स्थितीत मौजे मिरगाव येथील एक मयत व्यक्ती आढळून आलेली आहे.
तथापि, भूस्खलनाखाली व्यक्ती गाडल्या गेलेल्या असल्यामुळे निश्चित संख्या सांगता येत नाही. या ठिकाणी एनडीआरएफचे एक पथक आणि स्थानिक प्रशासन, नागरिकांच्यामार्फत युध्दपातळीवर शोध व बचावकार्य चालू आहे.जावली तालुक्यातील रेंगडी गावामध्ये दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून बेपत्ता आहेत व दोन व्यक्ती मयत झालेल्या आहेत.
तसेच वाई तालुक्यातील कोंढवळे येथे पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली गेलेली असून सद्य:स्थितीत दोन व्यक्ती मयत आढळून आलेल्या आहेत. या ढिगाऱ्यात अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
मौजे जोर याठिकाणी दोन व्यक्ती मयत आहेत. तसेच महाबळेश्वर तालुक्यामध्ये 594.04 मि.मी इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे बऱ्याचशा गावाचा संपर्क तुटला असून मौजे धावरी या ठिकाणी एक व्यक्ती मयत झालेली आहे.पावसामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचे व शेतीपिकांचे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात एक अतिरिक्त एनडीआरएफ चे पथक आज सायंकाळपर्यंत दाखल होणार असून यामुळे जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये तात्काळ शोध व बचावकार्यास मदत होणार आहे.
अतिवृष्टीमुळे नागरिकांनी पुढील प्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनमार्फत करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी पुराच्या पाण्यात प्रवेश करु नये. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. मुसळधार पावसासत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात अथवा इमारतीत आश्रय घेऊ नये. नदी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असल्यास कोणतही परिस्थितीत पूल ओलांडू नये. अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि अफवा पररवू नयेत असे, आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.